विविध पुरस्कार

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे डहाणूकर पत्रकारिता स्पर्धा दिवाळी अंकांची स्पर्धा होते त्याखेरीज काही पुरस्कारही दिले जातात. टाइम्स ऑफ इंडियामध्ये रमेश बोस नावाचे एक वार्ताहर होते. ते त्यावेळच्या सचिवालयातील बातम्या द्यायचे. त्या बातम्या खास व वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यामुळे त्यांनी उत्कृष्ट वार्ताहर म्हणून नाव कमावले होते. जुन्या पिढीतील पत्रकार रमेश बोस यांना कधीच विसरणार नाहीत. बोस यांचे खरे नाव होते रायकर. परंतु त्या काळात मराठी माणसाला इंग्रजी वार्ताहर म्हणून प्रवेश मिळणे कठीण होते. म्हणून रायकर यांनी बोस हे नाव स्वीकारले व इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश मिळवला व नाव कमावले ते रमेश बोस म्हणून. त्यांच्या पत्‍नी श्रीमती कमल यांनी आपल्या पतीच्या नावे पत्रकार संघाला १० हजार रुपयांची देणगी दिली. त्यातून रायकर-बोस शोधक पत्रकारिता पुरस्कार सुरू करण्यात आला.

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे अनेक बुजुर्ग पत्रकारांच्या स्मरणार्थ पुरस्कार दिले जातात. त्याची सुरुवात १९८३-८४ मध्ये झाली. आचार्च अत्रे यांच्या कन्या-मराठाच्या माजी संपादिका श्रीमती शिरीष पै यांनी पत्रकार संघाला दिलेल्या रु. १५००० च्या देणगीतून उत्कृष्ट संपादन केलेल्या अनुभवी व ज्येष्ठ संपादकास आचार्य अत्रे यांच्या नावे रोख १००१/- रु. चे पारितोषिक देण्यात येते. पहिल्या वर्षी औरंगाबादच्या 'मराठवाडा' दैनिकाचे संपादक अनंतराव भालेराव यांना हे पारितोषिक देण्यात आले. दुसर्‍या वर्षी या पारितोषिकाचे मानकरी होते कोल्हापूरच्या पुढारीचे संस्थापक संपादक ग. गो. जाधव. त्यांचे दुर्दैवाने १९८७ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचे सुपुत्र प्रतापसिंह जाधव यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृत्यर्थ पुरस्कार देण्याचा प्रस्ताव मांडला.

श्री. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यासाठी पत्रकार संघाला देणगी दिली त्यातून कै. ग. गो. जाधव पुरस्कार सुरू करण्यात आला. प्रथम हा पुरस्कार ३ हजार रुपये रोख होता. नंतर तो पाच हजार, दहा हजार आणि आता पंचवीस हजार करण्यात आला आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे एक ज्येष्ठ सदस्य व विश्वस्त श्री. ग.का.रायकर यांनी पत्रकार-लेखकाने लिहिलेल्या पुस्तकासाठी १००० रुपये असा पुरस्कार ठेवला आहे. या पुस्तकासाठी विजेत्याला शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात येते.

पत्रकार संघाचे एक संस्थापक समतानंद अनंत हरी गद्रे यांच्या नावे एक पुरस्कार दिला जातो. ते एक निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते होते. लहानमोठ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्मृतिदिनी ते सत्यनारायणाची पूजा करून ते त्या कार्यकर्त्यास श्रद्धांजली वहात. या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद म्हणून ते झुणका-भाकर वाटायचे. त्यामुळे त्यांच्या सत्यनारायणाला झुणका-भाकर सत्यनारायण असे नाव पडले. पत्रकार संघाने त्यांच्या नावे पुरस्कार देऊन त्यांची स्मृती कायम केली आहे. याखेरीज गो. भा. गुजर पुरस्कार १९९१-९२ वर्षी सुरू करण्यात आला. भ्रमंतीकार प्रमोद नवलकर यांनी भ्रमंती मानचिन्ह ठेवले आहे.

पूर्वीच्या जमान्यात मराठी पत्रकार इंग्रजी वर्तमानपत्रात अभावानेच असत. मराठी पत्रकाराला इंग्रजी वर्तमानपत्रात स्थान देणे म्हणजे पाप आहे असे इंग्रजी वृत्तपत्रांच्या संपादकांना वाटे. आज महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणार्‍या इंग्रजी वृत्तपत्रात मराठी वार्ताहरांची संख्या बरीच आहे. किंबहुना मराठी वार्ताहरांच्या मदतीशिवाय महाराष्ट्रात इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित करणे अशक्यच आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे. परंतु १९५० पूर्वी वार्ताहर म्हणून मराठी माणसाला इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश नव्हता. जी. जी. गोखले, गो. मं. लाड, जोग अशी निवडक दोन-चार नावे सोडली तर इंग्रजी वृत्तपत्रांत मराठी नाव आढळत नसे. त्याकाळात मराठी माणसाचा अर्ज आला की तो बाजूला ठेवण्याची प्रथा होती. त्यावेळी रायकर नावाच्या एका मराठी तरुणाने टाइम्स ऑफ इंडियात वार्ताहराच्या जागेसाठी अर्ज केला. परंतु अर्ज करताना स्वत:चे खरे नाव न देता रमेश बोस या नावाने अर्ज केला. सदर तरुण बंगाली आहे असे समजून टाइम्स ऑफ इंडियाने त्याला वार्ताहर नेमले. त्या तरुणाने वार्ताहर म्हणून चांगले नाव कमावले. त्यावेळी आता ज्या ठिकाणी सेशन्स कोर्ट आहे, त्या इमारतीत सचिवालय होते. राज्याचे मंत्रीही तेथेच बसत. रमेश बोस यांची सचिवालयातील वार्ताहर म्हणून नेमणूक झाली. शोधक पत्रकारिता हा शब्द जेव्हा अस्तित्वात नव्हता त्या काळात बोस यांनी शोधक पत्रकारिता केली व एक उत्कृष्ट वार्ताहर म्हणून नाव कमावले. बोस यांच्या पत्नीने संघाला १० हजार रुपयांची देणगी दिली. त्यातून पत्रकार संघाने त्यांच्या नावे शोधक पत्रकारितेसाठी एक पुरस्कार सुरू केला.

आणखी एक पत्रकार कै. भा. रा. पानवळकर यांच्या स्मरणार्थ एक व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. त्यात पहिले व्याख्यान १९८६ साली पत्रपंडित पां. वा. गाडगीळ यांचे झाले. या व्याख्यानमालेसाठी श्रीमती गीता पानवलकर यांनी देणगी दिली होती.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या संस्थापक सदस्यापैकी एक संघाचे माजी अध्यक्ष, नवशक्तीचे माजी संपादक आणि सुप्रसिद्ध साहित्यिक कै. प्रभाकर पाध्ये यांच्या प्रथम स्मृतिदिनी दि. २४ मार्च १९८७ रोजी विचारवंत प्रा. रा. भि. जोशी यांचे 'राष्ट्रीय एकात्मता' या विषयावर भाषण आयोजित करून पाध्ये यांचा स्मृतिदिन पाळण्यात आला.

पत्रकार संघाच्या घटनेत कलम ५ (ड) मध्ये असे म्हटले आहे की, "पत्रकारांचा दर्जा वाढविण्यासाठी शिबिरे, सहली, व्याख्यानमाला, संदर्भ ग्रंथालय व इतर तत्सम उपक्रम हाती घेणे." संघाच्या उद्देशातील या कलमाप्रमाणे विविध विषयांवर व्याख्याने होतात. त्यातून पत्रकारांचे प्रबोधन होते. पत्रकार संघानेच ग्रंथालयही सुरू केले आहे. नव्या भवनात ग्रंथालयासाठी स्वतंत्र जागा असून त्यात ग्रंथालयाचा विविध प्रकारे विस्तार करण्यात येईल. याखेरीज पत्रकारांच्या प्रबोधनाचा एक उत्तम मार्ग म्हमून विविध क्षेत्रातील व्यक्तींचे वार्तालापही आयोजित करण्यात येतात. त्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, स्थानिक स्वराज्य वगैर क्षेत्रातील विचारवंत व कार्यकर्ते यांचा समावेश असतो. त्यातील काही नावे अशी की, भारताचे पंतप्रधानपद भूषविलेले मोरारजी देसाई व इंदिरा गांधी, राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय व राज्यांचे मंत्री, मुंबईचे महापौर व महापालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त, काही विशेष सरकारी अधिकारी. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील प्रमुख सेनानी. पर्यावरण, पाणीवाटप आदी क्षेत्रातील अभ्यासू नेते असे विविध विषयांवर प्रबोधन करणारी मंडळी आहेत.

 

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com