श्री. नारायण गजानन आठवले

शिक्षण : बी. ए. ( जन्म १६ ऑगस्ट १९३२ )
अनिरुद्ध पुनर्वसू, नाना वांद्रेकर फकीरदास फटकळ, नारायण महाराज अशा विविध नावाने विविध प्रकारचे लिखाण.

१८ कादंब-या, २ कथा संग्रह व अन्य अशी २५ पुस्तके, महात्मा फुले यांच्यावरील प्रभंजन या कादंबरीला गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक प्राप्त, झुंजार पत्रकार म्हणून मराठी जगतात लौकीक, जनवाणी, लोकमित्र, लोकसत्ता, नवशक्ती, प्रभंजन आणि गोमन्तक मध्ये एकदर ३० वर्षे पत्रकारिता.

लोकसत्तेत 'भारुड' या सदरांतून अनेक ढोंगी राजकारण्याचे बुरखे फाडले. फटकळ गाथेतून ओविबद्ध साप्ताहिक मल्लीनाथी. 'सोबत' मधून 'बॉम्बे कॉलीग' या सदरातून नाना वांद्रेकर नावाने मुंबईतील मराठी माणसाच्या काळजाचे पडसाद उमटवले. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी झगडणा-या शिवसेनेबरोबर सर्वशक्तीनिशी उभे राहून शिवसेनेवर होणारे पत्रकारांचे व राजकारण्यांचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न केला.

'मराठी माणसा यावेळी चुकशील तर मुंबईला मुकशील' ही पुस्तिका काढून शिवसेना उमेदवारांसाठी उपलब्ध करुन दिली. येवढेच नव्हे तर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा गाजवल्या.

ललित चळवळीतल्या तरुणांबद्दल पहिल्यापासून आठवले यांना जिव्हाळा आहे. दलित साहित्याचा पापलोट ज्याच्या प्रकाशानांमुळे मुक्तपणे वाहू लागला तो नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा काव्यसंग्रह नारायण आठवले यांनीच प्रकाशित केला.

विद्यार्थी देशपासूनच सामाजिक राजकीय चळवळीत प्रत्यक्ष सहभाग. १९५२ साली धान्य भाववाढ विरोधी सत्याग्रहात एस. एम. जोशी यांच्या बरोबर पहिल्या तुकडीत सत्याग्रह करुन ३१ दिवसांचा कारावास.
गोमांतक मुक्ती लढ्यात पुण्यातून ३५ विद्यार्थ्यांची तुकडी काढून सुर्ले या खेड्यात प्रवेश, पोर्तुगीज सैनिकांकडून बेदम मारहाण.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात तीनवेळा कारावास. भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण यांच्या कडेकोट बंदोबस्तातील सभामध्ये एकट्याने प्रवेश मिळवून संयुक्त महाराष्ट्राचा पुकारा करुन मराठी जनतेचा आवाज उठवण्याची कामगिरी.

गोव्यात मराठी भाषेवर होणा-या अन्यायविरुद्ध संघर्ष करुन मराठी भाषा व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा झेंडा फडकावत-ठेवण्यासाठी सतत दहावर्षे जिद्दीने लेखणी चालवली.

मराठीवर प्रेम करणा-या गोमंतकीय जनतेच्या सहाय्याने गोव्यात मरठी अकादमी स्थापन करण्यात पुढाकार घेतला. हातात झोळी घेऊन गोमंतक मराठी अकादमीसाठी गावोगाव हिंडून दहा लाखाचा कायम निधी उभा केला.
गोव्यातील अपंग मुलांसाठी लोक विश्वास प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था लोकांच्या मदतीने उभी केली व सरकारचे अनुदान नसतांना दहावर्षे अपंग मुलांसाठी ही निवासी शाळा चालवून सरकार निष्क्रीय असेल तर लोकांच्या मदतीने मोठे काम कसे उभे करता येते याचा प्रत्यक्ष आदर्श उभा केला.

गोव्यातील शेकडो दु:खी गोरगरिबांसाठी लक्षावधी रुपये जमा केले व त्याच्या मदतीने अनेक कुटुंबांचा नवे जीवन मिळवून दिले.

'मुले वाचतील तर भाषा वाचेल' हा आवाज देऊन मुवंबईतील ४००० व्यक्तींना पत्राद्वारे आवाहन करुन गोव्यातील गोरगरीब छोट्या मुलांसाठी 'पुस्तकांचा योजना' ही योजना राबवली व २५० पुस्तकांच्या किमान २०० बॅगा विविध संस्थाना मोफत वाटून मुलांची वाचनाची सोय केली. त्यांच्यामध्ये वाचनाची आवड वाढवली. त्यांचे जीवन समृद्ध केले.

सरकारी मदत नसताना लोकांवर विश्वास ठेवून, लोकांच्या सहाय्याने लोकांसाठी अनेक उपक्रम राबवणारा हा एक कर्ता समाजसेवक आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे, आणि प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यपदही त्यांनी भूषवले आहे.

पहिल्या जनता पक्षाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान पदावरुन मराठी माणसाचा अवमान करणारे उद्गार पुन्हा एकदा काढले. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झुंजवला ते त्यावेळी जनता पक्षात असल्याने सोयिस्कर मौन पाळून गप्प बसले कॉंग्रेसवाले सत्ता गेली असल्याने कंबर खचून घरोघरी तोंड लपवून बसले होते. आचार्च अत्रे असते तर त्यांनी मोरारजीची चमडी लोळवली असती. पण ते नव्हते. नारायण आठवले यांनी 'प्रभंजन' ह्या आपल्या साप्ताहिकातून मोरारजीवर कोरडे ओढायला सुरुवात केली आणि मोरारजींचा निषेध करणा-या पत्रावर मुंबईकर मराठी माणसांच्या सह्या गोळ्या करण्याची मोहिम सुरु करुन मराठी माणूस मेलेला नाही याचा प्रत्यय आणून दिला.

शेकडो तरुण या मोहिमेत सहभागी झाले हुतात्मा चौकात धरणे, चर्चगेट, बोरीबंदर येथे सह्या गोळा करण्यारी केंद्रे उघडून नारायण आठवले यांनी आचार्य अत्रे यांचा वारसा चालवणारा एकतरी पत्रकार आहे हे दाखवून दिले. लक्षावधीच्या सह्या असलेली ही निषेध पत्रे आठवले यांनी दिल्लीत जाऊन समक्ष मोरारजींना सादर केली.

एक झुंजार पत्रकार, जनसामान्यांच्या सुखदु:खाशी समरस होणारा एक सहृदय साहित्यिक, परीवर्तनवादी वाटचालीतला एक निष्ठावंत वारकरी आणि लोकविश्वास जागवून लोकहिताची कामे उभी करणारा एक कर्ता समाजसेवक अशी नारायण आठवले उर्फ अनिरुद्ध पुनर्वसु यांची ओळख करुन देता येईल.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com