प्रकाश कुलकर्णी

प्रकाश ह. कुलकर्णी,
मुख्य संपादक, देशदूत, वृत्तपत्र समूह नाशिक
जन्म : १२ सप्टेंबर, १९४८, बेळगांव
प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण बेळगावं येथे. शैक्षणिक जीवनात विविध संस्थांच्या वक्तृत्व स्पर्धात सुमारे १०० पारितोषिके प्राप्त
बी-३०२, वसंत माईलस्टोन, वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८

श्री. प्रकाश ह. कुलकर्णी हे गेली सुमारे ४५ वर्षे पत्रकारितेत सक्रिय आहेत. गेल्या तीन वर्षापासून नाशिकच्या 'देशदूत' वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक असणारे श्री. कुलकर्णी यांनी दैनिक 'नवशक्ति' ( १९९९ ते २००९ ) व दैनिक वृत्तमानस ( १९९६ ते १९९९ ) या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून भरीव कामगिरी केली. त्यांनी १९७३ ते १९९६ अशा २३ वर्षात मुंबईच्या लोकसत्ता दैनिकांत उपसंपादक, वार्ताहर, मुख्य उपसंपादक, सहसंपादक, निवासी संपादक या पदावर काम करताना आपला ठसा उमटविला. आज प्रसारमाध्यमे प्रचंड विस्तारली आहेत. पण १९८४-८५ च्या काळात सर्वसामान्य वाचकांना प्रसार माध्यमांची कार्यपद्धती समजावून देणारे तसेच प्रसार माध्यमांतील घटनांचे विश्लेषण करणारे रविवार 'लोकसत्ता'तील श्री कुलकर्णी यांचे 'माध्यम' हे सदर त्या काळी खूप लोकप्रिय झाले होते. १९७३ साली मुंबईच्या वृत्तपत्रसृष्टीत दाखल होण्याआधी श्री. कुलकर्णी गोव्यातील राष्ट्रमत ( मडगांव ) आणि नवप्रभा (पणजी) या दैनिकांत सुमारे पाच वर्षे मुख्य उपसंपादक होते. त्याआधी, बेळगांवचे झुंझार पत्रकार स्व. बाबुराव ठाकूर यांच्या 'तरुण भारत' मध्ये त्यांनी पत्रकारितेचे प्राथमिक धडे गिरविले.

बेळगांव येथे जन्म आणि शिक्षण झालेल्या श्री. कुलकर्णी यांची पत्रकारिता मुंबईत बहरली. मुंबईत आल्यापासून त्यांचा मुंबई मराठी पत्रकार संघाशी घनिष्ठ संबंध असून संघाचे कार्यकारिणी सदस्य, संयुक्त सचिव आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे. १९८८-८९ आणि १९८९-९० अशी सलग दोन वर्षे ते पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. पत्रकार संघानी नवी वास्तू उभारण्याचा प्रकल्पाची, निधी समिती, वास्तुविशारदांची नियुक्ती आदी प्राथमिक पण महत्वाची कामे त्यांच्या कार्यकाळात झाली. गेली वर्षे ते पत्रकार संघाच्या वृत्तपत्रविद्या वर्गात मार्गदर्शन करतात.

पत्रकारितेच्या अभ्यासासाठी श्री. कुलकर्णी यांनी युरोपमधील अनेक देशांचा तसेच अमेरिकेला भेट दिली आहे. २००३ साली तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समवेत संयुक्त राष्ट्रांच्या दौ-यावर गेलेल्या शिष्टमंडळात श्री. कुलकर्णी हे एकमेव मराठी संपादक होते.

पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा 'श्री. शं. नवरे पत्रकारिता पुरस्कार' सासवडच्या आचार्य अत्रे प्रतिष्ठाचा 'आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार' यासह अनेक पुरस्कार लाभले आहेत. अलिकडेच मुंबईतील गुरुकुल प्रतिष्ठानने त्यांना 'पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कारा'ने सन्मानित केले आहे.

   

पत्रकार संघ अध्यक्ष परंपरा  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com