अभिरुप विधानसभा

सदस्यांच्या वार्षिक वर्गणीखेरीज संघाच्या उत्पन्नाचा एक मार्ग म्हणजे अभिरूप लोकसभा वा अभिरूप विधानसभेचे कार्यक्रम. पत्रकार संघाचे हे कार्यक्रम त्या काळात फारच लोकप्रिय झाले होते. संघ सदस्य त्यात उत्साहाने भाग घेत. गणेशोत्सवात तर बहुधा रोज एक कार्यक्रम होत असे. यापासून संघाचा फार चांगले उत्पन्न होई. सुरुवातीला या कार्यक्रमात भाग घेणारे पत्रकार या कार्यक्रमाला जाण्यायेण्याचा खर्चही घेत नसत. परंतु पुढे कार्यक्रमाचे उत्पन्न वाढल्यानंतर भाग घेणार्‍या सदस्यांना जाण्यायेण्याचा खर्च देण्यात येऊ लागला. अर्थात् या कार्यक्रमात भाग घेणारे पत्रकार कोणतीच आर्थिक अपेक्षा ठेवीत नसत. हा कार्यक्रम म्हणजे केवळ करमणूक नव्हती तर त्यातून संसद वा विधानमंडळांचे कामकाज कसे चालते याचे प्रबोधनही होत असे. या कार्यक्रमाची प्रसिद्धी इतकी झाली होती की लोणावळे येथील सरस्वती उत्सवाचे निमंत्रण पत्रकार संघाला आले. पत्रकार संघाने लोणावळे येथे जाऊन कार्यक्रम सादर केला. त्याची खूप प्रशंसा झाली.

महाराष्ट्रात १९७२ साली मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी पत्रकार संघाने या आपल्या हातखंडा असलेल्या कार्यक्रमाचे प्रयोग तिकिटे लावून केले व त्याचे उत्पन्न मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निवारण निधीला दिले. यापूर्वी १९५२ साली राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या वेळी पत्रकार संघाने अभिरूप लोकसभेचे कार्यक्रम करून जवळ जवळ आठ हजार रुपये भाऊसाहेब हिरे यांच्या हस्ते राज्यपालांच्या दुष्काळ निधीस दिले. पत्रकारांच्या सामाजिक बांधिलकीचा हा एक उत्तम नमुनाच मानावा लागेल.

पत्रकारांची संख्या वाढली त्याचबरोबर त्यांच्यावरील कामाचा बोजा वाढला. त्यामुळे या कार्यक्रमासाठी वेळ काढणे पत्रकारांना जड जाऊ लागले. त्यामुळे भाग घेणार्‍या पत्रकारांची संख्या रोडावू लागली. अखेर हा कार्यक्रम बंदच पडला. शेवटचा कार्यक्रम श्री. प्रकाश कुळकर्णी यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत मालाड येथे झाला. आज लोकशाहीविषयी एवढी चर्चा होत असताना प्रबोधनाचा एक चांगला कार्यक्रम बंद पडावा ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
या कार्यक्रमात आचार्य प्र.के.अत्रे, ह.रा.महाजनी, श्री. शं. नवरे, आप्पासाहेब खाडिलकर, आप्पा पेंडसे, दि. वि. गोखले. स. दि. पालेकर, निळुभाऊ खाडिलकर, तु. श्री.कोकजे, भालचंद्र मराठे, द. म.सुतार, प्रफुल्लकुमार मोकाशी, पु. वि. गाडगीळ, भा. म. निंबकर, भय्यासाहेब सहस्त्रबुद्धे, बाळ देशपांडे, पु.रा. बेहरे, चंद्रकांत पुरंदरे, अ.ह.गद्रे, राधाकृष्ण नार्वेकर, वि. स. बर्वे, सौ. नीला उपाध्ये, यशवंत मोने, यशवंत पिंपळीकर, कृ.पां. सामक, वसंत शिंदे, वसंत उपाध्ये, रंगनाथ कुळकर्णी, विश्वनाथ वाबळे, मनोहर देवधर, भारतकुमार राऊत, रा. धों, बाक्रे, सोमनाथ समेळ, राजा केळकर असे अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि नवोदित पत्रकार भाग घेऊन कार्यक्रमाला रंगत आणीत असत.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com