अ. भा. मराठी पत्रकार परिषद

मराठी पत्रकारांचे पहिले संमेलन मुंबईत झाले, दुसरे पुण्यात झाले त्यात मुंबई व पुण्याच्या पत्रकारांनी प्रामुख्याने भाग घेतला. मुंबई-पुण्याखेरीज इतर काही शहरातही मराठी वृत्तपत्रे प्रसिद्ध होत होती. हळूहळू हे पत्रकारही या संघटनेकडे आकृष्ट झाले आणि सर्व मराठी पत्रकारांची परिषद भरू लागली. या संघटनेला स्थायी स्वरूपही आले. मराठी पत्रकार परिषदेचे नाव अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद असे ठेवण्यात आले. परंतु दुर्दैव असे की परिषदेचे काम दोनदा बंद पडले आणि ते पुन्हा सुरू करण्याची महत्त्वाची कामगिरी मुंबई मराठी पत्रकार संघाला पार पाडावी लागली. पुण्याचे पां. रं. अंबिके यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे परिषदेचे चौदावे अधिवेशन झाले. त्यानतंर आठ वर्षे परिषदेचे अधिवेशन झाले नाही. त्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन अधिवेशन मुंबईत बोलविले. त्यानंतर १९७३ पर्यंत परिषद व्यवस्थित चालली. १९७३ साली अमरावतीचे श्री. बाळासाहेब मराठे परिषदेचे अध्यक्ष झाले आणि परिषदेचे काम पुन्हा एकदा थंड झाले. मुंबई मराठी पत्रकार संघाने पुन्हा एकदा १९७५ मध्ये पुढाकार घेऊन परिषद मुंबईत भरवली. तेव्हापासून मात्र परिषदेच्या कामकाजात काही खंड पडलेला नाही.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ५३ वर्षांच्या इतिहासात ३५ अधिवेशने झाली. त्यापैकी दहा अधिवेशनांची अध्यक्षपदे मुंबईकर मराठी पत्रकारांनी भूषविली आहेत. त्यात प्रा. न.र.फाटक, य.कृ.खाडिलकर, श्री. शं. नवरे, पां. वा. गाडगीळ, आचार्य प्र. के. अत्रे, प्रभाकर पाध्ये, यशवंत मोने व कुमार कदम यांचा समावेश आहे. नारायण आठवले हे पण अध्यक्ष झाले. परंतु आपल्या अध्यक्षपदाची मुदत संपण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. ह.रा.महाजनी यांचीही अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी समेलनात आपले अध्यक्षीय भाषण केले व भाषणाच्या अखेरीस आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर करून ते अध्यक्षीय खुर्चीवर न बसताच परिषदेतून निघून गेले.

मुंबई मराठी पत्रकार संघाने आणखी एक अध्यक्ष परिषदेला दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांचे नाव नरेंद्र बल्लाळ.

१९८२-८३ मध्ये बिहारमध्ये डॉ. जगन्नाथ मिश्रा मुख्यमंत्री होते. त्यांनी वृत्तपत्रांवर कडक निर्बंध घालणारे विधेयक बिहार विधानसभेत मांडले. ब्रिटिशांच्या निर्बंधांनाही लाजवील असे हे विधेयक होते. आक्षेपार्ह मजकूर छापणे व प्रकाशित करणे हा तर गुन्हा होताच, परंतु अशी वृत्तपत्रे विकणे किंवा वितरित करणे हा पण गुन्हा होता. यामुळे सकाळी घरोघर वृत्तपत्रे टाकणारी मुलेही शिक्षेस पात्र ठरत होती. या विधेयकाला देशभरच्या पत्रकारांनी विरोध केला. त्यासाठी जे आंदोलन झाले त्यात मुंबई मराठी पत्रकार संघाने दादरच्या खोदादाद सर्कलमध्ये सदर विधेयकाच्या निषेधार्थ धरण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात मराठीतर पत्रकारांनीही भाग घेतला. त्यामुळे पत्रकारांच्या अभेद्य शक्तीचे दर्शन घडले. देशभरच्या पत्रकारांच्या रेट्यामुळे डॉ. जगन्नाथ मिश्रा यांना हे विधेयक मागे घ्यावे लागले.

पत्रकारिता व पत्रकार यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध पत्रकार संघ अन्याय होणार्‍याच्या बाजूने उभा राहिला हे स्वाभाविकच आहे, परंतु दूरदर्शनने मराठी भाषेवर अन्याय सुरू केल्यावर प्रथम आवाज उठविला तो मुंबई मराठी पत्रकार संघाने. मुंबईच्या दूरदर्शनवर मराठी कार्यक्रमांमध्ये हळूहळू कपात सुरू झाली तेव्हा मुंबई मराठी पत्रकार संघाने हा प्रश्न हाती घेतला. मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य करावे ही मागणी प्रथम मराठी पत्रकारांच्या व्यासपीठावरून करण्यात आली. त्याचप्रमाणे मराठी भाषेला मुंबई दूरदर्शनवर जास्त प्राधान्य ही मागणीही मुंबई मराठी पत्रकार संघाने प्रथम केली. त्याबरोबर नभोवाणी आणि दूरदर्शन शासकीय नियंत्रणाखालून काढून त्याना स्वायत्तता द्यावी अशीही मागणी १९६६ साली केली. हा प्रश्न पुढे सर्वांनीच उचलून धरला. दूरदर्शनवर मराठीवर जो अन्याय होतो त्याविरुद्ध त्याचा निषेध करण्यासाठी मुंबई दूरदर्शनवर एक मोर्चाही नेला. या मोर्चात मराठी साहित्य संघ, मराठी ग्रंथसंग्रहालय, नाट्य परिषद, मराठी पत्रकार परिषद, वृत्तपत्र लेखक संघ, स्थानीय लोकाधिकार समिती, मराठी विज्ञान परिषद, मराठा महासंघ वगैरे अनेक संस्था सामील झाल्या. त्यावेळी एच. के. एल. भगत हे सदर खात्याचे मंत्री होते. त्यांचीही भेट घेण्यात आली व त्यांच्यापुढेही गार्‍हाणे मांडण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. त्यांच्याही ही गोष्ट ध्यानात आणून देण्यात आली. त्यांनीही हा प्रश्न केंद्र सरकारपुढे मांडून मराठी कार्यक्रमांचे प्रमाण वाढविण्याची मागणी केली व मराठी प्रेक्षकांचे समाधान करण्याचा आग्रह धरला. मराठी प्रेक्षकांचे समाधान व्हावी इतकी वाढ कार्यक्रमात झाली नाही परंतु कार्यक्रमाचे थोडे प्रमाण वाढले. तेव्हा मराठी भाषेवरील अन्यायाचे प्रश्नही पत्रकार संघ परिणामकारकपणे हाताळतो हे सिद्ध झाले.

१८ जानेवारी १९८२ रोजी डॉ. दत्ता सामंत यांनी मुंबईतील गिरणीकामगारांचा संप सुरू केला. एक वर्ष झाले तरी संप मिटण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. गिरणी कामगारांत मराठी कामगार प्रामुख्याने होते. त्यामुळे मराठी कुटुंबे हाल सोसणार्‍यात जास्त प्रमाणात होती. अर्थातच मुंबई मराठी पत्रकार संघाला वाटले की या मराठी कुटुंबांसाठी काहीतरी केले पाहिजे. पत्रकार संघाने कामगार नेते डॉ. सामंत, गिरणी मालक संघाने सरचिटणीस श्री. विजयनगर यांचे वार्तालाप ठेवले. हेतू हा की उभयतांच्या भूमिका लोकांपुढे याव्यात. पण एवढ्याने प्रश्न कसा सुटणार? तेव्हा पत्रकार संघाने उभय पक्षी तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्‍न केला. दुर्दैवाने उभयतांकडून त्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. परंतु पत्रकार लेखणी झिजवून सूचना करून थांबत नाहीत तर समझोता घडवून आणण्याचा प्रत्यक्ष प्रयत्‍न करतात हे दाखवून देण्यात आले.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com