कर्जतचा भूखंड

कर्जत स्टेशनपासून वीसएक मिनिटे चालण्याच्या अंतरावर श्रीधर गणेश साळसकर यांची जमीन होती. ते विकसित करून तेथील भूखंड त्यांनी विक्रीस काढले. त्यावेळी एक ६६५० चौ. फुटांचा भूखंड त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाला विनाअट, विनामूल्य देणगीदाखल देऊ केला. संघाच्या त्या वेळच्या पदाधिकार्‍यांनी हा भूखंड पाहिला व ते त्याच्या प्रेमातच पडले. आजुबाजूचा परिसर इतका सुंदर होता की अशा भूखंडाला नकार देणे हे नतद्रष्टपणाचे लक्षण ठरले असते. पदाधिकार्‍यांनी सदर भूखंडाचा स्वीकार करून तेथे पत्रकारांसाठी एक विश्रामधाम बांधावे असे कार्यकारिणीच्या मनात होते. श्री. साळसकर यांनी सदर भूखंड कोणतीही अट न घालता विनामूल्य देऊ केला. तसे पत्र त्यांनी ३-२-६९ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षांना दिले. तरीपण कायद्याच्या दृष्टीने यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत म्हणून संघाने हे काम कर्जतचे एक वकील श्री. दत्ता आरेकर यांच्यावर सोपविले. आरेकर वकील यानीही हे काम जणू आपलेच आहे असे समजून कोणतेही सेवा शुल्क न घेता व्यवस्थित पार पाडले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने दि ३-१२-६९ रोजीच्या बैठकीत एक ठराव मंजूर करून सदर भूखंड विनाअट स्वीकारला. त्यानंतर आरेकर वकील यांनी सर्व कागदपत्रे तयार केली. आणि संघाध्यक्ष व कार्यवाहांसह कर्जतच्या सबरजिस्ट्रारच्या कचेरीत गेले. तिथे आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि मुंबई मराठी पत्रकार संघ एका स्थावर मालमत्तेचा मालक झाला. स्वत:च्या नावावर भूखंड असणे ही केवढी अभिमानाची बाब आहे याचा अनुभव मुंबईतील पत्रकारांनी या निमित्ताने घेतला. मुंबईत अद्याप पत्रकार संघाला कचेरीलासुद्धा जागा मिळालेली नव्हती परंतु मुंबईबाहेर मात्र संघाच्या नावावर एक भूखंड नोंदविला गेला. त्या भूखंडाची किंमत काय तर ४३ रुपये ! वास्तवात भूखंडाची काहीच किंमत देण्यात आली नव्हती परंतु त्याचे कागदपत्र तयार करण्यासाठी व ते सरकार दरबारी नोंदविण्यासाठी ४३ रुपये खर्च आला तीच भूखंडाची किंमत धरावी लागेल. मुंबई मराठी पत्रकार संघ रायगड जिल्ह्यातील ( तेव्हाचा कुलाबा जिल्हा) कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मौजे वर्णे येथील सर्व्हे क्र. १२, हिस्सा क्रमांक १ मधील ६६५० चौ. फूट भूखंडाची मालकी संघाकडे आली आणि संघ मुंबईत बेघर परंतु मुंबई बाहेर भूखंडाचा मालक झाला.

भूखंडाची मालकी मिळाली, ताबा मिळाला, परंतु त्यावर वास्तू उभारायची म्हणजे पैशाचा प्रश्न होता. किमान ५० हजार रुपयांची आवश्यकता होती. तेवढी रक्कम संघाकडे नव्हती. ती रक्कम उभी  करण्याचे प्रयत्‍न सुरू झाले. त्याचवेळी संघाचा मुंबईत जागा मिळाली त्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नव्हती. संघाला कर्जतचा भूखंड मिळाला नंतर मुंबईत जागा मिळाली. त्या पाठोपाठ लोणावळ्यालाही एक भूखंड देणगी म्हणून मिळाला.
महात्मा गांधींचे चरित्रकार व पत्रकार दि. गो. तेंडुलकर यांच्या मृत्यूनंतर एक विश्वस्त निधी उभारण्यात आला. या विश्वस्त निधीतून लोणावळे येथील वनराई-को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत एक भूखंड विश्वस्तांनी खरेदी केला होता. त्या भूखंडावर तेंडुलकरांचे स्मारक उभारावे अशी विश्वस्तांची इच्छा होती. परंतु त्यांच्याकडे वास्तू बांधण्याइतका निधी उपलब्ध नव्हता. मुंबई महापालिकेचे त्यावेळचे सचिव श्री. वसंतराव अवसरे हे विश्वस्तांपैकी एक होते. त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाला विचारले की पत्रकार संघ या स्मारकात काही रस दाखविल का ? तेंडुलकर हे पत्रकारही होते तेव्हा त्यांच्या नावे स्मारक उभारणे हे पत्रकार संघाचे कर्तव्यच आहे असे पत्रकार संघाला वाटले व पत्रकार संघाने त्यात रस दाखविला. तेव्हा तेंडुलकर स्मारक निधीच्या विश्वस्तांची सभा होऊन त्यात हा भूखंड पत्रकार संघाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. अट एकच होती सदर भूखंडावर जी इमारत होईल त्याला दि. गो. तेंडुलकरांचे नाव द्यायचे. पत्रकार संघाने ही अट मान्य केली. विश्वस्तांनी भूखंड पत्रकार संघाला दिला. आता पत्रकार संघाच्या मालकीचे दोन भूखंड होते. एक रायगड जिल्ह्यात कर्जतजवळ आणि दुसरा पुणे जिल्ह्यात लोणावळे येथे. आता विश्रामधाम कोठे बांधावे हा प्रश्न संघ कार्यकारिणीकडे उभा राहिला.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com