समस्यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून झाला पाहिजे - सुमित्रा महाजन

असत्य सांगण्यास नकार, दडपशाहीचा प्रतिकार, त्याचबरोबर बातमी देताना समस्यांना उग्र रुप देण्यापेक्षा त्या समस्यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून झाला पाहिजे, पत्रकारांनी बातमी, मत आणि परीक्षण यातला फरक जाणून घेऊन बातमी दिली पाहिजे, असे प्रतिपादन लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांनी येथे केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

हा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन समारंभ आज पत्रकार भवनात संपन्न झाला. व्यासपीठावर मुख्य अतिथींसोबत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, चीफ पोस्ट मास्तर जनरल श्रीमती उषा चंद्रशेखर, अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष कुमार कदम, विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे, अजय वैद्य व प्रकाश कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद तेंडुलकर, संयुक्त कार्यवाह रवींद्र खांडेकर, उपाध्यक्ष प्रभाकर पवार, विजयकुमार बांदल, कोषाध्यक्ष दीपक म्हात्रे उपस्थित होते. समारंभाचे प्रास्ताविक व मुख्य अतिथी माननीय लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन यांचा सत्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी केला. मुख्य अतिथींचा परिचय विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे यांनी करून दिला.


मुख्य अतिथी लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, बातमीमध्ये बातमी असावी, टिप्पणी नसावी. लोकशाहीच्या चारही स्तंभांनी स्वत:चा तोल व्यवस्थित राखला. तर लोकशाहीची इमारत डळमळीत होणार नाही, याचे भान प्रत्येक स्तंभाने ठेवावे.


पत्रकार संघाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, पत्रकारांच्या गरजा मुंबई मराठी पत्रकार संघाने जाणल्या आहेत. त्यानुसार पत्रकार संघ ७५ वर्षांपासून विविध उत्तम उपक्रम राबवीत आहेत.
पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले आपल्या मनोगतात म्हणाले, गेल्या ७५ वर्षांमध्ये ४१ अध्यक्षांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुंबई मराठी पत्रकार संघ आज वैभवाला गेला आहे. मराठी भाषा आणि पत्रकारितेचे संवर्धन करीत समाजात सकारात्मकता आणण्यासाठी हा संघ मोलाची कामगिरी करीत आहे आणि करीत राहील. अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष कुमार कदम म्हणाले, मुंबई मराठी पत्रकार संघाने ५ खासदार दिले आहेत. महाराष्ट्राचा विभाजन होऊ न देण्याचा ठराव यावर्षी मुंबई मराठी पत्रकार संघाने केला आहे.
   

कार्यक्रम वृत्तात  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com