राज्यात पत्रकार सुरक्षा व्यवस्था प्रस्थापित करीन - गृहमंत्री

राज्यात पत्रकार सुरक्षा व्यवस्था प्रस्थापित करीन - गृहमंत्री


मुंबई दिनांक 13 - पत्रकारांवर होणारे हल्ले ही देशातील लोकशाही संबंधातही गंभीर बाब आहे असे मी मानतो, म्हणूनच मी तोंडपाटीलकी करतो असे समजु नका. या दृष्टीने पत्रकार संरक्षणाचा कायदा लवकरात लवकर करण्याचा आणि पत्रकारांच्या संरक्षणाबाबतची व्यवस्था प्रस्थापित करण्याचा मी प्रयत्न करीन असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री श्री. आर. आर. पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हास्तरावरील आणि मुंबई सारख्या शहरांतील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न मी आजवर करीत आलो असल्याचे सांगून गृहमंत्री पुढे म्हणाले की पत्रकारांवरील हल्ल्यांच्या समस्येखेरीज पत्रकारांचा आणखी एक प्रश्न मला महत्वाचा वाटतो. पत्रकारांना मालक आणि उद्योजक ज्या प्रकारे वागणूक देतात ही समस्या महत्वाची वाटते. त्यांच्या सेवाशर्ती, सेवानिवृत्ती इत्यादीबाबतचे प्रश्न शासनाने सोडविण्याची आवश्यकता मला वाटते. केंद्र सरकारने पारित केलेला नुकसानभरपाईचा कायदा महाराष्ट्र शासनाने स्विकारलेला आहेच. अशा त-हेन पत्रकारांचे सर्वच प्रश्न उपलब्ध होणा-या सर्वच व्यासपीठावरुन मी हिरीरीने माडीन अशी ग्वाही या निमित्ताने मी पत्रकारांना देतो

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार समारंभ आज पत्रकार भवनात पार पडला. महानगरचे संस्थापक संपादक निखील वागळे यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार गृहमंत्र्याच्या हस्ते बहाल करण्यात आला. या समारंभ प्रसंगी भाषण करताना गृहमंत्री श्री. आर. आर. पाटील यांनी वरीलप्रमाणे मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी पत्रकार संघाचे कार्यवाह विजयकुमार बांदल यांनी प्रास्ताविक भाषण केले. अध्यक्ष देवदास मटाले यांनी स्वागतपर भाषण केले. संयुक्त कार्यवाह प्रभाकर राणे यांनी सत्कारमूर्ती निखिल वागळे यांच्या पत्रकारितेतील कार्याचा परिचय करुन दिला.
पत्रकार निखिल वागळे यांनी आपल्या भाषणात पत्रकारांवर होणा-या हल्ल्याच्या घटनांचा इतिहास निवेदन करुन गेल्या काही वर्षात देशात पत्रकारांवर तीन हजाराहून अधिक हल्ले झाले असल्याचे सांगितले. शासनावर कडाडून हल्ला चढवताना वागळे म्हेणाले की सन 1991 पासून सात हल्ले माझ्यावर झाले. अन्य 21 पत्रकारांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या. या संबंधात पत्रकारांची समिती स्थापन होऊन शासनाबरोबर चर्चासुद्धा झाल्या. परंतु आजवर ह्या घटनांमधील एकाही गुन्हेगाराला अटक झालेली नाही. आचार्य अत्रे आज असते तर म्हणाले असते हे सरकार नासक्या डोक्याचे आहे!

या समारंभाप्रसंगी गृहमंत्री श्री. आर. आर. पाटील यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेसाठी विशेष कार्य करणारे माजी संयुक्त कार्यवाह माधव शिरवळकर यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाच्या www.patrakarsangh.com या संकेतस्थळासंबंधात शिरवळकर यांनी उपस्थितांना माहिती देणारे भाषण केले.

या प्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे चालविल्या जाणा-या पत्रकारिता व पदविका अभ्यासक्रमांत सर्वप्रथम आलेला विद्या्थी निलेश गोरे ( पदविका) यास दिनू रणदिवे पुरस्कृत दिनकर साकीकर पुरस्कार आणि भाग्यश्री नाईक (प्रमाणपत्र) हिला सुलभा मनोहर देवधर पुरस्कृत मनोहर देवधर पुरस्कार निखील वागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

पत्रकार संघाचे सदस्य आणि कर्मचारी यांच्या शालांत आणि उच्च माध्यमिक परिक्षेतील पुढील गुणवंत पाल्यांचा यावेळी गृहमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 1. हितेश शशीकांत सांडभोर 2. गायत्री प्रशांत इंदुलकर 3. सायली सुरेश ठुकरुल 4. दरवेश दिलीप पवार 5. भक्ती दशरथ राणे (मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स ) या गुणवंत पाल्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

   

कार्यक्रम वृत्तात  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com