कार्यक्रम वृत्तात

महापालिका निवडणूक अंदाज स्पर्धेत
सदानंद शिंदे व विकास मिश्रा प्रथम

मुंबई, दि. 29 : मुंबई मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या ''मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा 2012''चे पहिले अडीच लाख रुपयांचे पारितोषिक 'दै. नवाकाळ'चे पत्रकार सदानंद शिंदे आणि 'झी न्यूज'चे विकास मिश्रा यांनी विभागून पटकावले आहे.

नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अंदाज लेखी देण्याची पत्रकारांसाठीची स्पर्धा संजय काकडे ग्रुप या उद्योग समुहाने पुरस्कारीली होती. पारितोषिकांचा निकाल आणि वितरण समारंभ आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर विराजमान झालेल्या महायुतीचे नेते उध्दव ठाकरे (शिवसेना कार्याध्यक्ष), विनोद तावडे (विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते, भाजप) आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांनी स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्याच्या कामाचे निरीक्षण आणि नियंत्रक म्हणून काम पार पाडले. सुधीर गाडगीळ यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.

प्रारंभी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी स्वागतपर भाषण केले. विजेत्या स्पर्धकांना उध्दव ठाकरे, विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र, रोख व धनादेश देऊन  गौरव करण्यात आला. मुंबईतील 400 पत्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अचूकतेच्या जवळील अंदाज वर्तवणारे 6 पत्रकार विजेते ठरले. विजेत्या पत्रकारांची नावे पुढीलप्रमाणे पहिले पारितोषिक : (अडीच लाख रुपये) विभागून प्रत्येकी रु. 1 लाख 25 हजार) 1) दै. नवाकाळचे सदानंद शिंदे, 2) झी न्यूजचे विकास मिश्रा दुसरे पारितोषिक : (दीड लाख रुपये) विभागून : प्रत्येकी रु. 75 हजार 1) दै. नवशक्तीचे घन:श्याम भडेकर 2) 'जनतेचा महानायक'चे विठ्ठल कांबळे तिसरे पारितोषिक : (एक लाख रुपये विभागून) : प्रत्येकी 50 हजार 1) दै. प्रभातचे राजेश पुरंदरे, 2) पत्रकार संघाचे आजीव सदस्य दिलीप चावरे. उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपयांची सहा पारितोषिके 1) झी न्यूजचे दिलीप शिंदे, 2) दै. सामनाचे अतुल कांबळे, 3) दै. सामनाचे देवेंद्र भोगले, 4) 'ई टिव्ही'चे अविनाश लोंढे 5) दूरदर्शनच्या सरस्वती कुवळेकर आणि 6) लोकशाही वार्ताचे अनिकेत जोशी यांना देण्यात आली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले उध्दव ठाकरे, विनोद तावडे आणि रामदास आठवले यांनी विजेत्यांचे अभिनंदन करणारी भाषणे करताना मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या स्पर्धेबद्दल प्रशंसा केली. स्पर्धेचे पुरस्कर्ते संजय काकडे कौटुंबिक कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी समारंभानिमित्ताने पाठविलेल्या पत्राचे सुधीर गाडगीळ यांनी वाचन केले.

 

   

कार्यक्रम वृत्तात  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com