कार्यालय नव्या वास्तूत

नव्या विस्तृत जागेचा ताबा सरकारकडून मिळवून पत्रकार भवनाचे बांधकाम सुरू करावे असे प्रयत्‍न त्यावेळी सुरू केले होते. मुख्यमंत्री अंतुले यांच्याकडेच महसूल खात्याचा अधिभार होता व त्यांनी जागेचा ताबा देण्याचेही मान्य केले होते. परंतु अंतुले यांची सत्ता जाण्यापूर्वी वसंत शिंदे यांची वर्षभराची कारकीर्द संपली होती व चंद्रकांत भोगटे अध्यक्षपदी निवडून आले होते. त्यांनी व विश्वस्तांनी अंतुले यांची भेट घेऊन तात्पुरती जागा बांधून घेतली. या नव्या वास्तूत संघाने २८ जानेवारी १९८२ रोजी प्रवेश केला. त्यावेळच्या कार्यकारिणी सदस्या सौ. कुसूम रानडे व त्यांचे पती माधवराव रानडे यांच्या हस्ते वास्तुपूजन व उदकशांत करण्यात आली व संघाचे दफ्तर या नव्या वास्तूत हलवण्यात आले. अर्थात ही नवी जागा भाड्याचीच होती. स्वत:च्या वास्तूचे स्वप्न अपुरेच राहिले होते.

पुढील काळातील संघाध्यक्ष सर्वश्री यशवंत पिंपळीकर, यशवंत मोने, भारतकुमार राऊत यांनी शासनाकडून कायमस्वरूपी भूभाग मिळविण्याचे प्रयत्‍न चालूच ठेवले होते. अखेर यशवंत तथा नाना मोने यांच्या कारकिर्दीत तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व महसूलमंत्री विलासराव देशुमख यांनी पत्रकार संघाला जागा देण्याचे मान्य केले. या निर्णयावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब झाले. शंकररावांच्या कारकिर्दीतील त्यांच्या मंत्रिमंडळाची ही शेवटचीच बैठक होती. त्यानंतर संघाध्यक्ष यशवंत मोने व कार्यवाह अजय वैद्य यांनी मुंबईच्या जिल्हाधिकार्‍यांना रितसर अर्ज सादर केला, तेव्हाच शासकीय निर्णयाची पूर्तता झाली. पत्रकार संघाला जागा देण्याचे इरादापत्र तत्कालीन महसूलमंत्री श्रीमती प्रभा राव यांनी तयार केले. त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते दि. २८ जून १९८८ रोजी मंत्रालयात हे इरादापत्र त्यावेळचे संघाध्यक्ष भारतकुमार राऊत यांच्याकडे सुपूर्द केले. मुख्यमंत्र्यांनी या भवनासाठी आरंभीची एक लाख रुपयांची देणगीही मुख्यमंत्री निधीतून भारतकुमार राऊत यांच्याकडे दिली. याप्रसंगी कार्यवाह कुमारी वैजयंती कुलकर्णी, अजय वैद्य, सुकृत खांडेकर प्रभृती पत्रकार संघाचे पदाधिकारी हजर होते. राज्य शासनाने पत्रकार संघाला दिलेल्या ७४६.२५ चौ. मीटर जागेचा भाडेपट्टा नाममात्र वार्षिक १ रु. एवढा दि. २/८/८८ पासून निश्चित केला आहे. या भाडेपट्ट्याचे पहिले देयक १९९८ साली पत्रकार संघाकडे आले व संघाने त्याचा भरणा केला. हे देयक केवळ १८ रुपयाचे होते.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com