कै. आप्पा पेंडसे पुरस्कार

डहाणूकर पत्रकारिता पुरस्कार आणि दिवाळी अंकांची पारितोषिके त्याचबरोबर आणखी एका लिखाणासाठी पुरस्कार देण्यात येतो. त्या लिखाणाचा विषय आहे. 'नागरी समस्या' कै. आप्पा पेंडसे यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो. आप्पा पत्रकार संघाच्या संस्थापकांपैकी एक. संघाचे माजी अध्यक्ष व नंतर विश्वस्तही. आप्पा पेंडसे नागरी समस्यांवर नेहमी लिखाण करीत. 'महापालिकेत मंबाजी' हे त्यांचे गाजलेले सदर. म्हणून नागरी समस्यांवरील लिखाणाची खास नोंद घेण्यात आली. आप्पांची ज्येष्ठ कन्या डॉ. प्रतिभा व त्यांचे पती सूर्यकांत मेहता यांनी त्यासाठी ३ हजार रुपयांची देणगी दिली. १९९२ मध्ये त्या देणगीत या दाम्पत्याने ७ हजार रुपयांची भर घालून १० हजार रु. केले. तेव्हापासून हा पुरस्कार एक हजार रु. करण्यात आला. याबाबत आणखी एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे आप्पा स्वत: मुंबई महापालिकेचे पाच वर्षे नगरसेवक होते.
आप्पा पेंडसे यांच्या जन्मदिनी - १९ नोव्हेंबरला - त्या दिवशी पत्रकार संघाने एक व्याख्यान ठेवावे व व्याख्यानास मानधन द्यावे यासाठी आप्पांच्या पत्‍नी श्रीमती नंदिनी व दुसरी कन्या वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी देणगी दिली. त्यातून दर वर्षी आप्पा पेंडसे व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. आप्पा हे उत्तम वक्ते होते. त्याचप्रमाणे विविध विषयात त्यांना रस होता. त्यामुळे या व्याख्यानमालेला विषयाचे बंधन नव्हते. ही व्याख्यानमाला सुरू झाली ती सुप्रसिद्ध साहित्यिक व नावाजलेले पत्रकार व संघाचे माजी अध्यक्ष श्री. प्रभाकर पाध्ये यांच्या भाषणाने. त्यानंतर दर वर्षी विविध विषयातील अभ्यासूंना पाचारण करण्यात आले. आणि त्या सर्वांनी मोठ्या आनंदाने निमंत्रणे स्वीकारली.

नागरी समस्या हा जसा आप्पांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. तसाच संयुक्त महाराष्ट्र हा पण तितकाच किंबहुना जास्तच जिव्हाळ्याचा विषय होता. संयुक्त महाराष्ट्र या विषयावर आप्पांनी एवढी व्याख्याने दिली की पहिल्या चार-पाच व्याख्यात्यात त्यांचा क्रमांक लागावा. म्हणूनच महाराष्ट्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षात आप्पा पेंडसे व्याख्यानमालेसाठी हाच विषय निवडण्यात आला व व्याख्याते होते बेळगावचे लढाऊ पत्रकार बा. रं. सुंठणकर. याशिवाय संयुक्त महाराष्ट्र या विषयावर एस्. एम्. जोशी, दिनेश अफझलपूरकर, सत्यरंजन साठे. न्या. बी. जी. कोळसे-पाटील, माधव मनोहर, प्रमोद नवलकर यांची भाषणे झाली. या विषयावर एक परिसंवादही करण्यात आला. त्यात शां. शं. रेगे, राजा ढाले, प्रमोद नवलकर, प्रा. राम कापसे, वकील शशिकांत पवार, दि. वि. गोखले व माई आंबेडकर यांनी भाग घेतला. वि.स. पागे अध्यक्षस्थानी होते. आप्पा पेंडसे व्याख्यानमाला ही पत्रकार संघाची एक प्रतिष्ठित व्याख्यानमाला झाली आहे.

 

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com