घटना दुरुस्ती

संघाची जशी वाढ होऊ लागली व कार्यही वाढू लागले त्याप्रमाणे घटनेतील तरतुदी कमी पडू लागल्या म्हणून १९७३ मध्ये घटनादुरुस्तीचा विचार करण्यासाठी तु. श्री. कोकजे, राधाकृष्ण नार्वेकर व पद्माकर द. कार्येकर यांची एक समिती नेमण्यात आली. सदर समितीने आपला अहवाल दोन महिन्यात सादर केला. कार्यकारिणीने समितीच्या सर्व सूचना स्वीकारल्या परंतु त्यासाठी खास सर्वसाधारण सभा मात्र ताबडतोब घेणे शक्य झाले नाही. खास सर्वसाधारण सभा बोलावण्यास १८ मे १९७५ हा दिवस उजाडला. त्या दिवशी घटनादुरुस्तीसाठी खास सभा होऊन त्यात समितीच्या बहुतांश सूचना स्वीकारण्यात आल्या. या घटनादुरुस्तीनुसार 'आजीव सभासद' हा नवा वर्ग निर्माण करण्यात आला. जो सदस्य एकरकमी किंवा वर्षात हप्त्याने शंभर रुपये देईल त्यास आजीव सभासद करण्याचे ठरले. त्याला सदस्यत्वाचे सर्व अधिकार देण्यात आले. खरे म्हणजे १९७१च्या घटनादुरुस्तीनेच आजीव सदस्यत्व निर्माण करण्यात आले होते. नव्या दुरुस्तीने आजीव सदस्यत्वाची व्याख्या अधिक स्पष्ट करण्यात आली. सहसभासदांमध्ये सरकारी, निमसरकारी व अन्य संस्थांच्या प्रसिद्धी विभागात काम करणार्‍या व्यक्तिंचाही समावेश करण्यात आला. अशा सदस्यांना अर्थातच मतदानाचा हक्क देण्यात आला नाही. तरीही सहसदस्यांची संख्या त्यावेळी ७० वर गेली. याच घटनादुरुस्तीनुसार विश्वस्त कोणाला होता येईल हे ठरवण्यात आले. त्याचप्रमाणे निवडणुकीचे नियम तयार करून त्याचा समावेशही या घटनेत करण्यात आला. ही या घटनादुरुस्तीची दोन वैशिष्ट्ये होती. १९७९च्या घटनादुरुस्तीनुसार सभासद वर्गणी वार्षिक १५ रुपये करण्यात आली. त्याचप्रमाणे आजीव सदस्यत्व एकरकमी २५० रुपये देणार्‍यालाच बहाल करण्याचे ठरले. १९८८ साली वार्षिक वर्गणी ४० रु. करण्यात आली. तर आता ती ७५ रु. झाली आहे. आजीव सदस्यत्वासाठी एकरकमी ४०० रु. भरण्याची अट घालण्यात आली. परंतु आता आजीव सदस्यत्वासाठी रु. १००० भरावे लागतात. सहसदस्यत्वाची वार्षिक वर्गणी १०० रु. करण्यात आली आहे.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com