तेंडुलकर स्मृतिमंदिर

संघाच्या नव्या कार्यकारिणीने ऑगस्ट १९७४ मध्ये सूत्रे स्वीकारली. नव्या कार्यकारिणीपुढे पहिला प्रश्न चर्चेला आला तो म्हणजे विश्रामधाम कुठे बांधावे? कर्जत येथे विश्रामधाम बांधायचे तर कमी खर्चात काम होणार होते. तर लोणावळे येथील बांधकामासाठी जास्त खर्च येणार होता. लोणावळे येथील इमारतीस पाच ते सहा लाख रुपये लागतील असा अंदाज होता. पत्रकार संघाच्या विश्वस्तांकडे फक्त दीड लाख रु. होते. ते त्यांनी या कामासाठी देण्याची तयारी दर्शविली. या प्रश्नावर कार्यकारिणीने प्रदीर्घ चर्चा केली. लोणावळे हे थंड हवेचे ठिकाण व जाण्यायेण्यास अधिक सोयीस्कर शिवाय तेंडुलकरांचे स्मारक करण्याची आपण जबाबदारी स्वीकारलेली. हे स्मारक बेमुदत पुढे ढकलणेही योग्य नव्हते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन लोणावळ्याला प्राधान्य दिले. त्यासाठी स्मरणिका प्रसिद्ध करून पैसा उभारण्याचे ठरविले.

हा निर्णय झाल्याबरोबर एस्. एच्. गोडबोले आणि कंपनीला वास्तुशास्त्रज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले. सदर कंपनीचे सर्वश्री आर.पी. तलगिरी व दिलीप आठल्ये यांनी ही जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारली. इतकेच नाही तर वस्तुशास्त्रज्ञ म्हणून आपली सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली. सदर वास्तूचा सुंदर आराखडा तर तयार केलाच शिवाय बांधकाम सुरू असताना वारंवार लोणावळ्याला जाऊन देखरेख केली. त्यांनी लोणावळ्याला जाण्यायेण्याचा खर्चही घेतला नाही. उलट संघाच्या पदाधिकार्‍यांना आपल्या गाडीतून लोणावळ्याला नेले व आणले. म्हणजे पदाधिकार्‍यांचाही जाण्यायेण्याचा खर्च वाचला.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पहिले अध्यक्ष प्रा. न. र. फाटक यांच्या शुभहस्ते दुर्गाष्टमीला २४ ऑक्टोबर १९७४ रोजी भूमिपूजन झाले. प्रत्यक्ष बांधकामाला २ मे १९७५ रोजी सुरुवात झाली. बांधकामासाठी पाया खोदण्यास सुरुवात केल्यावर असे आढळले की सदर भूखंड भरावाचा असून जमीन भुसभुशीत आहे. पाया स्थिर होणे शक्य नाही. त्यासाठी रॅफ्ट फाऊंडेशनची गरज आहे. अर्थात खर्चात त्यामुळे थोडी वाढ होणार होती. परंतु इमारत मजबूत होण्यासाठी रॅफ्ट फाऊंडेशनला पर्याय नव्हता. तेव्हा कार्यकारिणीने त्याला मंजुरी दिली. त्याप्रमाणे सदर भूखंडाच्या उतारावरील माती पावसामुळे  वाहून जाऊन इमारतीला धोका निर्माण होण्याचीही शक्यता होती. त्यासाठी उतारावर पिचिंग करण्याची आवश्यकता होती. त्यालाही मान्यता देण्यात आली.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com