दिवाळी अंक प्रदर्शन -स्पर्धा

महाराष्ट्रात विशेषत: मराठी दिवाळी अंकांना फार मोठी परंपरा आहे. उत्कृष्ट दिवाळी अंक प्रसिद्ध करणे ही अभिमानाची बाब मानली जाते. दर वर्षी चांगला दिवाळी अंक कोणता यांची चर्चा वाचक करीत. मुंबई मराठी पत्रकार संघाने १९७३-७४ मध्ये दिवाळी अंकांचे पहिले प्रदर्शन भरविले. मराठीतील सर्व दिवाळी अंक एकत्र पाहण्याची संधी वाचकांना मिळाली. शेकडो लोकांनी हे प्रदर्शन पाहिले. त्यामुळे दिवाळी अंकांच्या चर्चेला उधाणच आले. दिवाळी अंकांच्या या प्रदर्शनाच्या यशाने पत्रकार संघावर आणखी एक जबाबदारी आली, ती म्हणजे इतक्या दिवाळी अंकातील चांगला अंक कोणता तो निवडून त्याला पारितोषिक देणे. १९७४-७५च्या कार्यकारिणीने ही जबाबदारी स्वीकारली आणि दिवाळी अंकांची स्पर्धा जाहीर झाली. जवळ जवळ दीडशे अंक स्पर्धेसाठी आले. त्यातून तीन उत्कृष्ट अंकांना पारितोषिके देण्याचे ठरले. दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविणे सोपे आहे परंतु त्यातून तीन उत्कृष्ट अंक निवडणे कठीण आहे. कारण प्रत्येक जण आपला अंक सरस करण्याचा प्रयत्‍न करीत असतो आणि त्यात स्पर्धा तीव्र असते. अंकाची केवळ सुबक छपाई एवढीच कसोटी नसते तर अंकातील मजकुराचा दर्जा ही पण एक कसोटी असते. त्यामुळे परीक्षकांना केवळ अंक पाहून भागत नाही तर आतील मजकूरही वाचावा लागतो वा नजरेखालून तरी घालावा लागतो. म्हणजे उत्कृष्ट तीन दिवाळी अंक शोधण्याचे हे काम वेळखाऊ आहे. एवढा वेळ कोण खर्च करणार असा प्रश्न असतो. सव्वाशे दीडशे अंक नजरेखालून घालणे म्हणजे दोन-तीन महिने तरी किमान लागतात. परंतु पत्रकार संघाने ज्यांना ज्यांना विनंती केली त्या कोणी विनंती कधी अव्हेरली नाही. नेहमी चांगले परीक्षक मिळाले व त्यांनी मन लावून परीक्षण केले व उत्तम सहकार्य दिले हे पत्रकार संघाने भाग्यच. १९७४-७५ साली सुरू झालेली ही स्पर्धा आजतागायत सुरू आहे. आणि ती कधी बंद पडेल असे वाटत नाही. कारण प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे.

स्पर्धेच्या पहिल्या वर्षी म्हणजे १९७४ च्या दिवाळीत निघालेल्या शे-सव्वाशे अंकांपैकी जे तीन उत्कृष्ट अंक पारितोषिकांसाठी निवडण्यात आले. त्या पारितोषिकांना दिवाळी अंक निर्मितीतील तीन अध्वर्यूंची नावे देण्यात आली. कै. दीनानाथ दलाल (दिपावली), कै. अनंत अंतरकर (हंस) व कै. रत्‍नाकर देसाई ( ) ही तीन नावे होत. ही नावे देताना त्यासाठी देणगीची मागणी केली नाही. परंतु ही पारितोषिक योजना चालू रहावी यासाठी रत्‍नाकर देसाई यांचे मित्र नारायण आठवले यांनी प्रथम दोन हजार रुपयांची देणगी दिली शिवाय पहिल्या वर्षींच्या बक्षिसासाठी दोनशे रुपये दिले. नंतर अंतरकर व दलाल कुटुंबियांनीही देणग्या देऊन ही पारितोषिक योजना कायम केली.

दिवाळी अंकाच्या या योजनेची लोकप्रियता वाढू लागली. स्पर्धेत भाग घेणार्‍या दिवाळी अंकांची संख्या तर वाढू लागलीच परंतु बक्षिसे देण्यासाठी नवे नवे देणगीदार पुढे येऊ लागले. दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ हे आकर्षक असणे ही एक आवश्यक बाब समजण्यात येते. एक काळ असा होता की दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ हे रघुवीर मुळगांवकर किंवा चित्रकार दलाल यांचेच असले पाहिजे. अनेक दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांची असत. तेव्हा १९८० साली उत्तम मुखपृष्ठासाठी रघुवीर मुळगावकर यांच्या नावे पारितोषिक सुरू करण्यात आले. ग. का. रायकर यांनी त्यासाठी देणगी दिली. ग. का. रायकर यांच्या दीपलक्ष्मीच्या मुखपृष्ठावरील चित्र मुळगावकरांचे असे शिवाय अनेक पुस्तकांची वेष्टनेही ते तयार करून देत. अशा तर्‍हेने दिवाळी अंकावरील मुखपृष्ठाच्या महत्त्वाची नोंद घेण्यात आली.
सर्वसाधारणपणे मोठ्यांसाठी दिवाळी अंक काढणे त्या मानाने सोपे परंतु मुलांसाठी अंक काढणे जास्त कठीण. बालवाङ्‌मय, बालकांसाठी मासिके ही एक दुर्मिळ चीज झाली आहे. त्यामुळे बालांसाठी उत्तम दिवाळी अंक काढण्यासाठी पत्रकार संघाचे एक सदस्य व ज्येष्ठ पत्रकार शं.ल.चिटणीस यांनी देणगी दिली व त्यांच्या पत्‍नी सौ. इंदुमती चिटणीसं यांच्या नावे एक पारितोषिक सुरू करण्यात आले. दिवाळी अंकाच्या उत्कृष्ट संपादनाबद्दल कै. केशवराव कोठावळे पारितोषिक देण्यात येते. १९८४ च्या दिवाळी अंकांपासून ही दोन पारितोषिके सुरू झाली.

आणखी एका व्यक्तीची दिवाळी अंकाच्या वाटचालीत फार मोलाची कामगिरी आहे. ही व्यक्ती म्हणजे 'आवाज'चे मधुकर पाटकर. आवाज हा संपूर्ण विनोदी अंक असतो. प्रत्येक दिवाळी अंकात थोडाफार विनोदी मजकूर असल्याशिवाय दिवाळी अंक पुराच होऊ शकत नाही. अशा उत्तम विनोदी लेखनास एक पारितोषिक द्यावे अशी पाटकर यांनी इच्छा व्यक्त केली व त्यासाठी एक देणगीही दिली. त्यातून उत्कृष्ट विनोदी लेखनासाठी 'आवाज' पारितोषिक सुरू करण्यात आले.

सर्वसाधारण दिवाळी अंकाचे आणखी एक आकर्षण म्हणजे हास्यचित्रे. दिवाळी अंक म्हणजे वैचारिक लेख; विविध सामाजिक, आर्थिक व राजकीय विषयांवर परिसंवाद, कथा, कादंबर्‍या, कविता, विनोदी लेख व कथा तसेच हास्य कविता असे अनेक प्रकारचे लिखाण. शिवाय हास्यचित्रे, व्यंगचित्रे वगैरेचे सुंदर मिश्रण म्हणजे दिवाळी अंक असे आज समीकरण झाले आहे. तेव्हा दिवाळी अंकातील हास्यचित्रांना पारितोषिकात स्थान देऊन त्यांचे महत्व जाणणे आवश्यक होते. तेव्हा दिवाळी अंकातील उत्तम हास्यचित्राला पारितोषिक देण्यात आले. कै. शं. वा. किर्लोस्कर यांचे. दिवाळी अंकांची ३ पारितोषिके ७ पर्यंत गेली.

 

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com