पत्रकार दर्पण

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रकाशित होणारे 'पत्रकार दर्पण' हे प्रकाशन आता बर्‍याच प्रमाणात नियमित झाले आहे. त्याआधी संघातर्फे विशेष प्रसंगी स्मरणिका प्रसिद्ध होत. १९७४-७५ व १९७५-७६ साली तर दरवर्षी दोन स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आल्या व त्याचे सर्व उत्पन्न लोणावळे येथील विश्रामधामाच्या बांधकामासाठी वापरण्यात आले. परंतु संघाने अशा स्मरणिका प्रकाशित करण्यापेक्षा संघाचे नियमित प्रकाशन काढावे, थोडक्यात नियतकालिक प्रकाशित करावे असे ठरले. त्यासाठी 'पत्रकार दर्पण' हे नावही निवडण्यात आले. त्याला रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्सची मान्यता मिळणे आवश्यक होते. संघाचे माजी अध्यक्ष श्री. चंद्रकांत पुरंदरे यांनी ही मान्यता मिळविण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली. तेव्हापासून 'पत्रकार दर्पण' च्या प्रकाशनात बर्‍याच प्रमाणात नियमितता आली. १९८२-८३ हे वर्ष त्याला अपवाद.
मुंबई मराठी पत्रकार संघाचा इतिहास लिहिताना १९७५ च्या जूनमध्ये इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली ही गोष्ट विसरता येणार नाही. ही आणीबाणी जाहीर होऊन नागरिकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर जशी अनेक बंधने आली तशीच पत्रकारितेवरही बंधने आली आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य बासनात गुंडाळून ठेवण्यात आले. या गोष्टीचा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक घेऊन या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला. ठरावाचे वृत्तही सर्व वृत्तपत्रांकडे पाठविण्यात आले परंतु ते कोणत्याही वृत्तपत्रात छापून येणार नाही याची खबरदारी शासनाने विविध वृत्तपत्रांत नेमलेल्या अधिकार्‍यांनी घेतली.
पुढे ६ जानेवारी १९७६ रोजी 'पत्रकार दिन' आला. त्याचे महनीय प्रवक्ते म्हणून यदुनाथ थत्ते यांनी निमंत्रण स्वीकारले. परंतु थत्ते हे आणीबाणीच्याविरुद्ध भाषण करणार आणि पत्रकार संघ अडचणीत येणार अशी विश्वस्तांना शंका वाटली. त्यावेळी गो. मं. लाड, श्री. शं नवरे आणि आप्पा पेंडसे हे तिघे संघाचे विश्वस्त होते. तिघेही आणीबाणीचे विरोधक होते परंतु विश्वस्त म्हणून पत्रकार संघाच्य मालमत्तेचे रक्षण करणे ही पण त्यांची जबाबदारी होती. त्यामुळे विश्वस्तांनी हा पत्रकार दिन संघाच्या इमारतीत न करता बाहेर करावा असे सुचविले. कार्यकारिणी या गोष्टीला तयार नव्हती. विश्वस्त व कार्यकारिणी यांच्यातील हा एक तात्त्विक मतभेदाचा मुद्दा झाला.

अखेर विश्वस्तांनी कार्यकारिणीला असे कळविले की, थत्ते यांना निमंत्रण दिलेच आहे तर त्यांना संघात येऊदे परंतु त्यांनी भाषण करू नये कारण त्यामुळे संघ अडचणीत येण्याचा संभव आहे. कार्यकारिणीने  हे मान्य केले परंतु अशी एक सूचना आली की थत्ते यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या पत्रकारांनी आझाद मैदानाला एक मौन फेरी घालावी. त्यापेक्षा पत्रकारांनी मौन पत्रकार दिन साजरा करावा. ते जास्त परिणामकारक ठरेल असे जास्त प्रभावी मत दिसले. म्हणून कार्यकारिणीने मौन व्रताचा मार्ग अवलंबिला. यदुनाथ थत्ते पत्रकार दिनाचे महनीय प्रवक्ते म्हणून आले परंतु त्यांनी वक्तव्य केलेले नाही. पत्रकार दिनाच्या महनीय प्रवक्त्याने मौन धारण केले. त्यांचे हे मौन बरेच बोलके ठरले. पुढे कालांतराने हे भाषण पत्रकार दर्पणमध्ये छापले.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com