पत्रकार भवनाचे उद्घाटन...

या भवनाचे रीतसर उद्‍घाटन महाराष्ट्र दिनी दि. १ मे १९९७ रोजी शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकार भवनाचे शिल्पकार, संघाध्यक्ष वसंत शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. विद्या शिंदे यांचा महाराष्ट्र शासनातर्फे सत्कार केला. पत्रकार संघाने माजी मुख्यमंत्री शरद पवार, सुधाकरराव नाईक, शंकरराव चव्हाण, सभापती जयंतराव टिळक आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता पत्रकार भवनाचा वापर सुरू झाला आहे. तिथे विविध कार्यक्रम होऊ लागले आहेत. सदस्यांची वर्दळ वाढली आहे. भवन सुसज्ज करण्याचे काम टप्प्या-टप्प्याने सुरूच आहे. मुंबई महापालिकेने या भवनासाठी मालमत्ता कराची आकारणी केली असून हे कर भरणे सध्यातरी पत्रकार संघाच्या आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून या करामध्ये सूट मिळावी यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. पत्रकार भवनाच्या देखभालीसाठी उत्पन्नाची नवी साधने शोधावी लागणार आहेत. पत्रकार संघाने १९४३ साली पाहिलेले पत्रकार भवनाचे स्वप्न आता प्रत्यक्षात आले आहे. पहिल्या मजल्यावर पत्रकार संघाचे कार्यालय, संदर्भ ग्रंथालय, पत्रकार परिषदांसाठी सभागृह, संपर्क दालन अशी रचना असून दुसर्‍या मजल्यावर २५० आसन व्यवस्था असलेले लोकमान्य सभागृह आणि चौथ्या मजल्यावर दोन वसतिगृहे सज्ज होत आहेत. अशा प्रकारे १२ हजार चौ. फुटाचे बांधकाम असलेली भवनाची वास्तू दिमाखाने आझाद मैदानात उभी आहे.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com