पत्रकार संघाची घटना

मुंबई मराठी पत्रकार संघाची पहिली घटना १९४१ मध्ये तयार करण्यात आली त्यात पत्रकार कोणास म्हणावे व संघटनेत कोणाला प्रवेश द्यावा हे स्पष्ट केलेले आहे. त्यात पत्रकारिता हा ज्याचा मुख्य व्यवसाय आहे तोच संघाचा सभासद होऊ शकतो असे जरी म्हटले असले तरी प्रत्यक्षात या व्याख्येची काटेकोर अंमलबजावणी झालेली दिसत नाही. जो वृत्तपत्रांत लिहितो तो पत्रकार असेच व्यवहारात तत्व मानून संघ सदस्यत्व दिलेले दिसते. इतक्या मवाळपणे पत्रकार या शब्दाचा अर्थ लावूनही संघाची सदस्यसंख्या शंभराच्या घरात गेली नाही. त्यावेळी सदस्य वर्गणी वर्षाला एक रुपया व प्रवेश फी फक्त आठ आणे होती. स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रांची संख्या हळूहळू वाढू लागली. त्याबरोबर पत्रकारांचीही संख्या वाढू लागली. अर्थात् संघसदस्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. तेव्हा पत्रकार संघातील अनेक सदस्यांच्या मनात 'पत्रकार' शब्दाच्या अधिक स्पष्ट व्याख्येची गरज आणि काटेकोर अंमलबजावणीची आवश्यकता भासू लागली. त्याप्रमाणे पूर्णवेळ पत्रकारिता करणार्‍यांनाच संघसदस्यत्व देण्यात यावे अशी उघडपणे चर्चा सुरू झाली. परंतु पूर्णवेळ पत्रकारितेस वाहून घेतलेल्यांनाच पत्रकार संघाचे सदस्यत्व द्यावे हा विचार सुरवातीपासूनच होता म्हणून १९४९च्या घटना दुरुस्तीनुसार सदस्यांची विभागणी दोन वर्गात करण्यात आली. एक मराठी वृत्तपत्रे, नियतकालिके व वृत्तसंस्था यांच्या संपादकीय विभागात विविध पदांवर काम करणारे तसेच मोबदला घेऊन वृत्तपत्रात नियमित लेखनकार्य करणारे व प्राधान्येकरून पत्रव्यवसाय करणारे यांस पत्रकार संबोधून संघाचे सदस्यत्व द्यावे असे ठरले. संघाचा एखादा सदस्य वृत्तपत्र व्यवसायातून निवृत्त झाल्यावर संघ सदस्य राहू इच्छित असेल तर त्याचे सदस्यत्व 'सहकारी सदस्यत्व' या शीर्षकाखाली चालू ठेवावे. अशा सदस्यास मतदानाचा अधिकार राहणार नाही व पदाधिकारी म्हणून निवडणूक लढविता येणार नाही अशी बंधने घालण्यात आली.

पत्रकार संघाने १९७१ साली आपल्या घटनेत महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या. यातील प्रमुख दुरुस्ती म्हणजे संघाच्या कार्यालयाचा पत्ता घटनेत नमूद करण्यात आला. कारण त्यापूर्वी संघाच्या कार्यालयाला कायम स्वरूपी पत्ता नव्हता. म्हणून घटनेत अशी तरतूद होती की, 'संघाचे कार्यालय संघ कार्यकारिणी ठरवील त्या ठिकाणी राहील, मात्र कार्यकारी मंडळाने कार्यालयाचा सदर पत्ता वृत्तपत्रातून जाहीर केला पाहिजे.' १९७० साली शासनाने पत्रकार संगाला बोरीबंदरसमोर आझाद मैदानात एक घर दिले. त्यामुळे घटनेतील चवथ्या कलमात पुढीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली. 'संघाचे कार्यालय मुंबई शहरात पत्रकार भवन, एन्सा हटमेंटस्, आझाद मैदान, मुंबई १ येथे राहील. यात कोणताही बदल करावयाचा झाल्यास तो कार्यकारिणी ठरावाने करील व त्याची सूचना सात दिवसांच्या आत संस्था निबंधकाला देईल.' संघाचे कार्यक्षेत्र मुंबई महापालिकेच्या हद्दीपुरते ठरविणारी दुरुस्तीही करण्यात आली. तशी दुरुस्ती घटनेच्या कलम २ मध्ये करण्यात आली.

मूळ घटनेत पत्रकारांना पगार नियमित मिळणे व त्यात वाढ होणे, प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युइटी मिळण्याची व्यवस्था करणे, नोकरीचे नियम निश्चित करणे इत्यादी दिशांनी प्रयत्‍न करणे, असे कलम होते परंतु शासनाने याबाबत कायदा करून हे नियम केले व वेतन मंडळ नेमून पत्रकारांच्या वेतनश्रेण्याही ठरविल्या. त्यामुळे हा प्रश्न सुटला. शिवाय याबाबत काही तंटे निर्माण झाल्यास ते हाताळण्यासाठी श्रमिक पत्रकारांची संघटनाही तयार झाली. त्यामुळे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या घटनेतून हे कलम वगळण्यात आले. मराठीप्रमाणे अन्य भाषिक वृत्तपत्रांत व नियतकालिकांत काम करणार्‍या मराठी भाषिक पत्रकारांना संघाचे दरवाजे खुले करण्यात आले त्यामुळे इंग्रजी, हिंदी व गुजराथी वृत्तपत्रांतून काम करणारे अनेक मराठी भाषिक पत्रकार संघाचे सदस्य झाले. संघाचे कार्यक्षेत्र मुंबई महापालिकेची हद्द असे घटनेत म्हटले होते त्याचा तपशील घटनेत नमूद करण्यात आला तो असा :  ज्याचे व्यावसायिक क्षेत्र अथवा निवासस्थान बृहन्मुंबई महापालिकेच्या हद्दीत असेल अशास संघाचे सदस्य होता येईल. त्याप्रमाणे १५ वर्षे पत्रव्यवसाय करून निवृत्त झालेल्या मराठी भाषिक व्यक्तीस संघाचे सदस्यत्व मिळू शकेल अशीही तरतूद करण्यात आली. संघ सदस्यत्वाची वर्गणी १९४१ साली वार्षिक १ रु. होती व प्रवेशफी फक्त ८ आणे होती. १९४९ मध्ये वार्षिक वर्गणी ३ रुपये करण्यात आली परंतु सहकारी सदस्यांना फक्त २ रु. होती. १९७१ मध्ये वार्षिक वर्गणी १० रु. करण्यात आली व प्रवेशफी एक रुपयावर नेण्यात आली.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com