पत्रकार संघाला स्थैर्य आले.

मुंबई इलाखा सरकारच्या गृहनिर्माण मंडळाने वांद्रे पूर्व येथे स्वत:ची भव्य वास्तू उभारली. त्यापूर्वी त्यांच्या कचेर्‍या बोरीबंदरला आझाद मैदानात युद्धकाळात उभारलेल्या पत्र्याच्या बॅरॅक्समध्ये होत्या. नवी वस्तू बांधल्यानंतर गृहनिर्माण मंडळाच्या कचेर्‍या नव्या वास्तूत हलविण्यात आल्या. त्यामुळे या बॅरॅक्स रिकाम्या झाल्या. या बॅरॅक्सला जोडून एक छोटे 'नमुना' ( मॉडेल हाऊस) घर होते. स्वस्तात घर बांधण्याचा एक प्रयोग म्हणून हे घर बांधलेले होते. एन्सा हटमेंट असे या घराचे नाव होते तसे ते घर फार सोयीचे नव्हते. तरीही सरकारने हे घर भाड्याने मुंबई मराठी पत्रकार संघाला दिले. पत्रकार संघाने, डोक्यावर छप्पर तरी येत आहे ना असा विचार करून ते घर स्वीकारले. पत्रकार संघाच्या कचेरीची, संघाचे अध्यक्ष वा चिटणीसांचे निवासस्थान- ग.का. रायकर यांचे दुकान - मुंबई मराठी साहित्य संघ अशी ३० वर्षे चाललेली फिरती बंद झाली व पत्रकार संघाची कचेरी स्थिर झाली. पत्रकार संघाला ४-१२-७० रोजी या एन्सा हटमेंटचा ताबा संयुक्त कार्यवाह म्हणून वसंत शिंदे यांनी गृहनिर्माण मंडळाकडून घेतला. येथे संघाची कचेरी तर स्थिर झाली. सर्व मराठी पत्रकारांना एकत्र बसण्यास एक जागा झाली. या घरातील त्यातल्या त्यात एका मोठ्या खोलीचे रूपांतर छोट्या सभागृहात करण्यात आले. यासाठी फर्निचर खरेदी वगैरे खर्च आलाच. संघाकडे पैसा नव्हता आणि पैशाशिवाय टेबलखुर्च्या कुठून येणार ? अशा अवस्थेत पत्रकार संघ सापडला. त्यावेळी अण्णासाहेब डहाणूकर हे पत्रकार संघाच्या मदतीला धावून आले. त्यांनी संघाची कचेरी व सभागृह फर्निचरने सजवून दिले. त्या सभागृहाला लोकमान्य टिळकांचे नाव देण्याचे ठरले आणि मुंबई मराठी पत्रकार संघ लोकमान्यांच्या नावाशी जोडला गेला.

मुंबई मराठी पत्रकार संघाला कचेरीसाठी जागा मिळण्याआधी कर्जत स्टेशनपासून दोन-तीन-किलोमीटर अंतरावर एक भूखंड देणगी म्हणजे मिळण्याचा योग आला अर्थात संघाच्या कचेरीला तो भूखंड उपयोगी नव्हता. परंतु तिथे एक छोटेसे विश्रांतिगृह बांधून पत्रकारांच्या सुटीतील राहण्याची व्यवस्था करावी असे त्यावेळच्या कार्यकारिणीतील बहुतेकांना वाटू लागले. त्यामुळे या भूखंडाचा स्वीकार करण्याचे कार्यकारिणीने ठरविले व तसा ठराव कार्यकारिणीच्या सभेत ३-१२-६९ रोजी मंजूर केला.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com