पत्रकार सहाय्य निधी

मराठी पत्रकारांची आर्थिक स्थिती वेतनमंडळाच्या अंमलबजावणीनंतरही काही फारशी सुधारली नाही तरीही मराठी पत्रकारांनी आपली ताठर भूमिका सोडली नाही. त्यामुळे आर्थिक अडचण ही कायमची बाब राहिली. अशा पत्रकारांना आर्थिक अडचणीच्या वेळी थोडी अधिक मदत करावी यासाठी पत्रकार संघाने एक बिनव्याजी कर्ज योजना सुरू केली. ही योजना सुरुवातीला अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही. तरीही अनेक पत्रकारांना या योजनेतून साह्य देण्यात आले. कर्जे घेणार्‍या पत्रकारांनी कर्जे परत करण्याबाबत नियमितपणा दाखविला तरच ही योजना यशस्वी होणार नाहीतर कशी यशस्वी होणार? काही पत्रकारांनी कर्जे घेतली परंतु परतण्याबाबत मात्र मौन स्वीकारले त्यामुळे योजना राबविणे कठीण जाऊ लागले. तरीही पत्रकार संघाने ही योजना मोठ्या जिद्दीने चालू ठेवली. आता पत्रकारांनी कर्जे सहाय्य परत करण्याची जबाबदारी स्वीकारली असल्याने योजना चालू ठेवणे शक्य झाले आहे. आता प्रामुख्याने पत्रकारांना वैद्यकीय उपचारासाठीच सहाय्य देण्यात येते.

या कर्जाखेरीज काही ज्येष्ठ पत्रकारांना आर्थिक साह्य देण्याचाही पत्रकार संघाने प्रयत्‍न केला. केसरीचे माजी संपादक व तत्त्वनिष्ठ वयोवृद्ध पत्रकार ग. वि. केतकर यांना त्यांच्या विपत्कालात तसेच संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार द. म. सुतार हृदयविकाराने आजारी पडले तेव्हा संघाने शासनाला विनंती करून सुतार यांना आर्थिक साह्य मिळवून दिले. अशाच प्रकारे पुण्याचे मा. वि. साने व विनायक भावे यांनाही त्यांच्या अखेरच्या काळात मुंबई मराठी पत्रकार संघानेच शासनाकडून आर्थिक साह्य मिळवून दिले. संघाचे सदस्य छोटू जुवेकर यांच्या आजारपणात संघ सदस्यांनी काही रक्कम जमवून त्यांना तसेच जुन्या प्रभातमधील एक वार्ताहर श्री. तरटे व 'नवशक्ति'चे संपादक भाऊ जोशी, माजी अध्यक्ष चंद्रकांत भोगटे व यशवंत पिंपळीकर, दत्ताराम बारस्कर, रामचंद्र पां. पवार, जगन फडणीस, शरद गुर्जर, कृ.पां.सामक यांच्या आजारपणात त्यांना संघाने मुख्यमंत्री साह्यनिधी , श्री सिद्धीविनायक मंदिर विश्वस्त निधी, श्री महालक्ष्मी टेंपल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून आर्थिक साह्य मिळवून दिले. इतकेच नाही तर पत्रकार संघाचे माजी दिवंगत अध्यक्ष भालचंद्र मराठे यांच्या पत्‍नीस पत्रकार संघाच्या प्रयत्‍नामुळे शासनाच्या सांस्कृतिक खात्यातर्फे मानधन देण्यात येते. पत्रकारांना मदत करणे हे तर पत्रकार संघाचे कर्तव्यच आहे. परंतु त्याच्या कुटुंबियांच्या समस्यांकडे पत्रकार संघाचे लक्ष असते हेही यामुळे सिद्ध झाले.

काही पत्रकारांच्या पत्रकारितेची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. नवाकाळचे माजी संपादक नीळकंठ खाडिलकर व लोकसत्ताचे माजी संपादक माधव गडकरी तसेच शिडाच्या होडीतून जगप्रदक्षिणा करणार्‍या पत्रकार श्रीमती उज्ज्वला पाटील-धर यांना पद्मश्री किताब देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचा पत्रकार संघाने सन्मान केला.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com