पहिले अध्यक्ष न. र. फाटक

या संमेलनात असेही ठरले की, या सर्व कार्यासाठी स्थायी स्वरूपाची व कायमची संघटना असावी, तरच कार्यात सातत्य राहील. म्हणून पत्रकार संघाची स्थापना झाली. संघाला स्थायी स्वरूप द्यायचे तर दैनंदिन कार्याला मार्गदर्शन करणारी घटना हवी. ती तयार करण्यात आली आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचा जन्म झाला. पत्रकार संघाच्या स्थापनेची सभा लोकमान्य दैनिकाच्या कार्यालयात २१ जून १९४१ रोजी झाली. याच्या दुसर्‍याच दिवशी रशियाच्या फौजा जर्मनीविरुद्ध युद्धात उतरल्या आणि दुसर्‍या महायुद्धाची व्याप्ती वाढली. मुंबई मराठी पत्रकार संघाची अधिकृत स्थापना व संघाचे पहिले अध्यक्ष म्हणून प्रा. न. र. फाटक यांची निवड झाली. मुंबईचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून पुण्यातील मराठी पत्रकारांनीही आपला संघ स्थापन केला आणि महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांचे दुसरे संमेलन पुण्यात बोलाविले. त्याचे अध्यक्षस्थान प्रा. न. र. फाटक यांनी भूषविले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या स्थापनेआधी सात दिवस देशी भाषा वृत्तपत्रांची अखिल भारतीय पातळीवरील संघटना स्थापन झाली. या संघटनेचे दरवाजे देशी भाषांतील वृत्तपत्रांना खुले होते, परंतु त्या काळात फार थोडीच वृत्तपत्रे या संघटनेत सामील झाली. ही संघटना प्रामुख्याने व्यवस्थापनांची होती. त्यामुळे या संघटनेत प्रामुख्याने व्यवस्थापनांचे प्रतिनिधी असत. व्यवस्थापनांच्या प्रश्नांची यात चर्चा होत असे. युद्धकाळात छपाईच्या कागदाची टंचाई भासू लागली. हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ही संघटना स्थापन होऊन सदर संघटनेचे पहिले शिष्टमंडळ सरकारकडे गेले ते छपाईच्या कागदाच्या टंचाईचा प्रश्न घेऊन. त्यानंतर सरकारी जाहिराती, पृष्ठ किंमत कोष्टक यांसारख्या प्रश्नांवर संघटनेने प्रयत्‍न केलेले दिसतात. पत्रकारांना प्रशिक्षण असा जरी उद्देश संघटनेच्या घटनेत असला तरी त्या दृष्टीने  काही काम झालेले दिसत नाही. इंडियन न्यूजपेपर सोसायटी (इंडियन अँड ईस्टर्न न्यूजपेपर सोसायटी हे जुने नाव) ही पण व्यवस्थापनांचीच संघटना आहे व ती फार जुनी आहे. बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट म्हणजे श्रमिक पत्रकारांची संघटना. तिची स्थापना १९३१-३२च्या सुमारास झाली. पण त्यावेळी त्या संघटनेचे नाव होते इंडियन जर्नालिस्टस् युनियन. या संघटनेत प्रामुख्याने इंग्रजी पत्रकार होते. व त्यांचीच ही संघटना आहे असे भासत होते. तिला श्रमिक पत्रकार संघटनेचे स्वरूप आल्यावर त्यांत सर्व भाषांतील श्रमिक पत्रकार सामील झाले.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com