पाया खोदाईचा शुभारंभ

असंख्य अडथळे दूर करीत असतानाच दि. ५ जानेवारी १९९१ रोजी पत्रकार भवनाच्या बांधकाम आराखड्यास पालिकेकडून मंजुरी मिळाली. तेव्हा मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर दि. १४ जानेवारी १९९१ रोजी अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष कुमार कदम यांच्या हस्ते पाया खोदाईचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्यक्ष बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या. सर्वात लघुत्तम निविदा सुमारे ५७ लाख रुपयाची होती. खर्चात काटकसर व देणग्यांवर भर या धोरणानुसार ही प्रकल्प उभारणी सुरू होती. त्यावेळी संघाचे विश्वस्त चंद्रशेखर वाघ यांच्यामुळे सुवीरकुमार चौधरी या बांधकांम तज्ज्ञांची भेट झाली. त्यांनी पत्रकार भवनाचे बांधकाम 'ना नफा ना तोटा' या तत्त्वार करून देण्याचे मान्य केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या भव्य वास्तूचे बांधकामदेखील त्यांनीच केले होते. चौधरी यांच्या मे. चौधरी अ‍ॅण्ड चौधरी ( इंडिया) लि. या कंपनीने २६ लाख रुपयांत संपूर्ण वास्तू उभी करुन देण्याचे मान्य केले. त्यामुळे आधीच्या निविदा रद्द करून स्थापत्य विशारद चंद्रकांत गुमास्ते यांच्या सल्ल्याने चौधरी यांची नवीन ठेकेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पत्रकार संघाच्या सुवर्ण-महोत्सवी वर्षातच गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर रविवार दि. १८ मार्च १९९१ रोजी विधान परिषदेचे सभापती जयंतराव टिळक यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली. त्यावेळी विलासराव देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पायाभरणी झाली तरी इतर अडथळे होतेच. संघाला मिळालेल्या भूखंडावर अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे कार्यालय तसेच 'इन्फा' या संस्थेची कचेरी होती. परिषदेचे कार्यालय पर्यायी जागेत हलविण्यात आले. परंतु 'इन्फा'चे संचालक इंद्रजित यांनी पर्यायी जागेत जाण्याची टाळाटाळ केली. म्हणून शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सक्षम प्राधिकार्‍यांमार्फत कारवाईची प्रक्रिया सुरू ठेवली. मुख्यमंत्री शरद पवार, त्यांचे सचिव अजित निंबाळकर व सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता एम.बी.घरबुडे यांच्या सहकार्यामुळेच 'इन्फा'चा प्रश्न सोडवणे शक्य झाले.

'इन्फा' व परिषदेची कार्यालये हटवल्यानंतर बांधकामाचा वेग वाढविण्यात आला व जोथ्यापर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले. पुढे ६ एप्रिल १९९२ रोजी भवनाची पहिला स्लॅब टाकण्याचे काम पुरे झाले तेव्हा डहाणूकर पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी आझाद मैदानात येऊन भवनाच्या बांधकामाची प्रगती पाहिली व मुख्यमंत्री निधीतून या कामासाठी पत्रकार संघाला भरीव किंबहुना हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत लागेल तेवढी मदत देण्याचे जाहीर केले. परिषदेचे अध्यक्ष कुमार कदम यांनी या अर्थसहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांशी प्राथमिक चर्चा केली होती. मुख्यमंत्री नाईक यांनी पवार यांच्या आश्वासनापैकी उर्वरित पाच लाखांचा निधी तात्काळ देऊन टाकला व टप्प्याटप्प्याने अर्थसहाय्य देण्यास सुरुवात केली. सुधाकररावांचा शब्द पुढच्या मुख्यमंत्र्यांनी पाळला. मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री निधीतून एकंदर २१ लाख रुपये पत्रकार भवनासाठी मिळाले तर सुधाकरराव नाईक यांच्यामुळे एकूण २२ लाख ५० हजार रुपये उपलब्ध झाले. पैशाअभावी बांधकाम थांबू नये याची काळजी पत्रकार संघाने घेतली. परंतु काही तांत्रिक बाबींवर मात करीत असतानाच रेती टंचाई, मुंबईतील जातीय दंगली, भीषण बॉम्बस्फोट मालिका, भूकंपाचे संकट, पोलादाचा वाढीव खर्च, या सारख्या अडचणी उभ्या राहिल्या. मुंबईतील अस्थिर परिस्थितीवरही मात करून बांधकाम पूर्ण करण्यात आले.

 

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com