भूमिपूजन

शासनाने दिलेल्या भूखंडावर भारतकुमार राऊत यांच्या कारकिर्दीत दी. १० सप्टेंबर १९८८ रोजी माजी संघाध्यक्ष कृ.पां.सामक व सौ. मीराताई सामक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले व त्याच दिवशी दुसरे माजी संघाध्यक्ष द. म. सुतार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शरद पवार यांनी भवनाची कोनशिला बसविली. संघाध्यक्ष भारतकुमार राऊत अध्यक्षस्थानी होते. जागेचा ताबा मिळाल्यामुळे पत्रकार संघाने भवन उभारणीच्या कामाला गती द्यावी अशी अपेक्षा त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. नंतरचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांनी ज्येष्ठ पत्रकार व विधान परिषदेचे सभापती जयंतराव टिळक यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार भवन निधी समितीची स्थापना केली आणि मेसर्स म्हात्रे-गुमास्ते या स्थापत्य विशारदांना भवनाचे आराखडे तयार करण्यास सांगितले. मुख्यमंत्री निधीतून जाहीर झालेल्या १० लाख रुपयांपैकी ५ लाख रुपये पत्रकार संघाकडे जमा झाले. पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य, 'सामना' व 'मार्मिक'कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भवनासाठी १ लाख रुपये देणगी दिली. निधीसंकलनाचे कार्य सुरूच होते. परंतु काही तांत्रिक बाबीमुळे सुमारे दोन वर्षे हा भूखंड विकसित करणे शक्य झाले नाही. त्यानंतर वसंत शिंदे यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली ( १४ जून १९९०). त्यांनी पत्रकार भवन उभारणी हे एकच लक्ष्य समोर ठेवून व इतर कामे बाजूला ठेवून जुळवाजुळव सुरू केली. त्यावेळचे महसूलमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पत्रकार संघाला प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश साळवी व उपजिल्हाधिकारी प्रताप पाटील यांच्यासमवेत संघाध्यक्ष वसंत शिंदे, अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष कुमार कदम, संघाचे उपाध्यक्ष अजय वैद्य यांची बैठक घेतली. त्यानंतर दोनच दिवसांत उपजिल्हाधिकारी प्रताप पाटील यांनी पत्रकार संघाला प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून दिले त्यामुळे बांधकाम आराखड्याचे दोन वर्षे अडलेले काम मार्गी लागले. पत्रकार संघाला मिळालेल्या भूखंडात मुंबई महापालिकेच्या एका जुनाट विहिरीचा समावेश होता. या जागेचाही प्रश्न तत्कालीन महसूलमंत्री शंकरराव कोल्हे यांनी महापालिका आयुक्त के. पद्मनाभय्या यांच्या मदतीने सोडविला व पुढे पूर्ण जागेचे प्रॉपर्टीकार्ड मतदार संघाला मिळाले. परंतु आराखडे मंजुरीपूर्वी इमारतीभोवती मोकळी जागा सोडण्याची अट शिथिल करवून घेण्यासाठी पूर्वीच्या पालिका आयुक्तांनी आकारलेला ७८ लाख रुपयांचा प्रीमियम (दंड) भरण्याचा प्रश्न संघापुढे उभा राहिला. पालिका सभागृहाचे नेते दिवाकर रावते यांच्या मध्यस्थीमुळे आयुक्त पद्मनाभय्या यांनी या प्रीमियमची फेरआकारणी करून तो ७ लाख रुपये इतका केला. पुढे ही रक्कम १ लाखावर आणण्यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री सुधाकराव नाईक, नगरविकासमंत्री वसंत चव्हाण व नगरविकास सचिव डी.टी.जोसेफ, उपसचिव पंतबाळेकुद्री यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.

भवनाचे आराखडे मंजूर होण्याची शक्यता पाहून भूखंडाभोवती आवार भिंत घालण्याचे काम सुरू करण्यात आले. विश्वस्त ग. का. रायकर यांच्या हस्ते कुदळ मारण्यात आली. या भिंतीच्या पायासाठी त्यावेळचे महापौर दिवाकर रावते यांनी शंभर गोणी सिमेंट पत्रकार संघाला देणगी दाखल दिले.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com