पत्रकार संघ इतिहास आणि परंपरा

मराठी पत्रकारांचे पहिले संमेलन

युद्ध परिस्थिती आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य, तद्‍नुषंगाने वृत्तपत्रांपुढे निर्माण होणारे अनेक प्रश्न यांचा सामायिकपणे विचार केला पाहिजे ही भावना पत्रकारांमध्ये रुजली व दृढ होऊ लागली. मुंबईतील पत्रकार एकत्र जमले व या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व मराठी पत्रकारांना व मराठी वृत्तपत्र व्यवसायिकांना एकत्र आणण्याची गरज असल्याचे त्यांना जाणवले. पत्रकारांनी व व्यावसायिकांनी जे काय म्हणावयाचे ते एकत्रितपणे व संघटितपणे मांडावे ही भूमिका सर्वांनाच पटली. तेव्हा मुंबईच्या पत्रकारांनी महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांचे एक संमेलन मुंबईत बोलाविले. या संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून नाही परंतु मुंबईखेरीज पुण्याचे बरेच पत्रकार हजर होते. इंग्रज राज्यकर्त्यांनी, वृत्तपत्रांनी काय लिहावे, कसे लिहावे व काय लिहू नये याचा फतवा काढला. या फतव्याची कशी वासलात लावायची याचा विचार पत्रकार संमेलनात झाला. सर्व मराठी पत्रकारांनी एकत्र येऊन पाऊल उचलण्याची गरज या संमेलनात व्यक्त करण्यात आली व त्या दृष्टीने कृतीही सुरू झाली. अशा कृतीसाठी सर्वसमावेशक, प्रातिनिधिक व एकजिनसी अधिष्ठान प्राप्त झाले पाहिजे म्हणून जे काही करायचे वा म्हणायचे असेल ते सर्व मराठी पत्रकारांनी एकत्र बसून, एकत्रित व संघटितपणे विचार करून ठरवावे व जे ठरेल त्याप्रमाणे वागावे असा निर्णय झाला. जी कृती करावयाची ती परिणामकारक होण्यासाठी संघटनेला अधिकार असला पाहिजे, त्यासाठी संघटनेची शक्ती वाढविली पाहिजे हा विचार प्रभावी झाला. त्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व मराठी पत्रकारांची एक बैठक बोलाविण्याचे ठरले.

मुंबईतील विठ्ठलभाई पटेल रोडवर, ख्रिश्चन मिशनर्‍यांनी चालविलेल्या विल्सन हायस्कूलचे पटांगण मोठे होते. तिथे मंडप घालून त्या मंडपात डिसेंबर १९३९ मध्ये मुंबई आणि उपनगर साहित्य संमेलन भरले होते. हे संमेलन संपल्यानंतर त्याच मंडपात मराठी पत्रकारांचे पहिले संमेलन भरले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पुण्याच्या 'ज्ञानप्रकाश'चे संपादक कृष्णाजी गणेश लिमये होते. स्वागताध्यक्ष मुंबईच्या 'नवाकाळ' दैनिकाचे संपादक य. कृ. खाडिलकर होते. या संमेलनात युद्धजन्य परिस्थितीत वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच करणारे कायदे, निर्बंध वगैरे विषयांवर प्रामुख्याने विचार विनिमय झाला. महाराष्ट्रातील सर्व मराठी पत्रकारांनी या संमेलनाला येऊन आपले विचार मांडावे अशी अपेक्षा होती. परंतु मुंबईखेरीज पुण्याचे काही पत्रकार आले. महाराष्ट्राच्या इतर भागातील मराठी पत्रकारांनी मोठी निराशा केली. जमलेल्या पत्रकारांनी वृत्तपत्रांवरील निर्बंध व संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा केली.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com