मराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे

ब्रिटिश राजवटीने चालविलेल्या दडपशाहीविरुद्ध टोकदार लेखण्या झिजविणारे मराठी पत्रकार, आपल्या जळजळीत लिखाणाने जनतेला परकी राजवटीविरुद्ध उठाव करण्यास उद्युक्त करीत होते. त्यासाठी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन करीत होते, काँग्रेससारखी प्रभावी संघटनेची शक्ती वाढावी म्हणून आपल्या लेखण्या झिजवीत होते. पण आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी संघटित होण्याची कल्पनाही त्यांना सुचली नाही असे आढळून येते. अशी संघटना निर्माण होण्यासाठी दुसरे महायुद्ध सुरू व्हावे लागले. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिशांनी हिंदुस्तानाला ओढले आणि मराठी पत्रकारांना आपली संघटना उभारण्याची गरज भासू लागली.

दुसरे जागतिक महायुद्ध १९३९ मध्ये सुरू झाले. ब्रिटन या युद्धात उतरले. आपण हिंदुस्तानासह या महायुद्धात सहभागी होत आहोत अशी घोषणा ब्रिटिश सरकारने केली. त्यावेळी हिंदुस्तानात १९३५ च्या कायद्यानुसार सात प्रांतात काँग्रेसची सरकारे सत्तेवर होती. परंतु सदर सरकारांशी विचारविनिमय न करताच ब्रिटिश सरकारने हिंदुस्तानला युद्धात खेचले. याचा अर्थ ब्रिटिश सरकारने हिंदुस्तानला दिलेली स्वायत्तता ही केवळ दिखावू होती. भारतातील सात प्रांतीत सरकारांचे काय म्हणणे आहे हे ऐकण्याचीही गरज ब्रिटिश सरकारला वाटली नाही. ब्रिटिशांनी आपल्याशी विचारविनिमय न करताच भारताविषयी परस्पर निर्णय घेतला या गोष्टीच्या निषेधार्थ सात प्रांतीय सरकारांनी राजीनामे दिले. आणि ब्रिटिशांची दिखावू प्रांतिक स्वायत्तता संपुष्टात आणली.

ब्रिटनमध्ये जरी लोकशाही असली तरी ब्रिटन युद्धात पडल्यानंतर या लोकशाही सरकारला युद्ध परिस्थितीत सर्वाधिकार आपल्या हाती असले पाहिजेत असे वाटणे स्वाभाविक होते. विशेषत: ज्या देशांवर ब्रिटिशांची सत्ता होती तेथील आपल्या अधिकार्‍यांना सर्वाधिकार देण्याची गरज ब्रिटिश सरकारला वाटली. त्याप्रमाणे ब्रिटिश सरकारने आपल्या अधिकार्‍यांना सर्वाधिकार दिले. काँग्रेस सरकारांनी राजीनामे दिल्यामुळे हिंदुस्तानातील ब्रिटिश अधिकार्‍यांना मिळालेले अधिकार निरंकुश झाले. वृत्तपत्रांचे महत्त्व किती आहे याची ब्रिटिश सरकारला जाणीव होती. हिंदुस्तानातील देशी वृत्तपत्रांना नियमाच्या साखळ्यांनी जखडून टाकणे आवश्यक असल्याचे ब्रिटिश सत्ताधार्‍यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वृत्तपत्र लिखाणावर अनेक बंधने घातली. शितावरून भाताची परीक्षा करण्यात कुशल असलेल्या मराठी पत्रकारांनी भावी काळात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे त्याचा अंदाज बांधला. या येणार्‍या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे याचा वृत्तपत्रे व पत्रकार स्वतंत्रपणे आणि गटागटाने विचार करू लागले.

   

पत्रकारिता इतिहासाचे टप्पे  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com