वर्धापन दिन व पत्रकार दिन

वर्धापन दिन

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ पत्रकाराला व्याख्याता म्हणून बोलाविण्यात येते. सदर व्याख्यात्याचे भाषण हे पत्रकारांच्या दृष्टीने एक वैचारिक मेजवानीच असते. १९५५ ते १९६१ ही सहा वर्षे वगळता ही मेजवानी अखंडपणे चालू आहे. ५५ ते ६१ संघाचेच काम खंडित झाल्यामुळे ही व्य़ाख्याने त्या काळात झाली नाहीत. १९४८ साली पत्रकार संघाचा वर्धापनदिन प्रथमच साजरा झाला. त्याचे महनीय प्रवक्ते होते किर्लोस्कर मासिकाचे संपादक शं. वा. किर्लोस्कर. तेव्हापासून महाराष्ट्रातील नामवंत व ज्येष्ठ पत्रकारांना निमंत्रण देण्याची प्रथा सुरू झाली ती चालूच आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाकडून वर्धापन दिनाचा महनीय प्रवक्ता म्हणून निमंत्रण येणे हा आपल्या पत्रकारितेचा गौरव आहे असे ते ज्येष्ठ पत्रकार मानतात व खासगीत बोलूनही दाखवितात.

पत्रकार दिन

ज्याप्रमाणे मुंबई मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन दर वर्षी २१ जूनला साजरा होतो त्याचप्रमाणे दर वर्षी ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा होतो. कारण १८३२ साली याच दिवशी  कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' नावाचे पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले.

पत्रकार संघाच्या सुरुवातीच्या काळात विविध समारंभानिमित्त मुंबईबाहेरील मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना महनीय प्रवक्ते म्हणून पाचारण करण्यात येई व तेही सदर आमंत्रण म्हणजे आपला गौरवच आहे असे मानून येत व मराठी पत्रकारितेच्या विविध अंगाने विचार करून आपले विचार मांडीत. दिवाळी अंकांची स्पर्धा सुरू झाली आणि त्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरणास मराठी भाषिकेतरास निमंत्रित करून नवीन प्रथा सुरू करण्यात आली. प्रसिद्ध गुजराथी साहित्यिक व पत्रकार श्री. बँकर यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते पारितोषिके वाटण्यात आली. त्यांनी या समारंभात हिंदीत भाषण केले. याच वर्षी आणखीही एक असाच प्रसंग झाला.
बाळशास्त्री जांभेकरांनी आपले वृत्तपत्र ६ जानेवारीला सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला. तेव्हा ६ जानेवारी हा दिन पत्रकार दिन म्हणून साजरा करावा असा आदेश १९६४ मध्ये अ. भा. मराठी पत्रकार परिषदेने दिला. त्यानुसार मुंबई मराठी पत्रकार संघ हा दिन साजरा करतो. या दिवशी एका ज्येष्ठ पत्रकाराचे पत्रकारितेवर भाषण ठेवण्यात येते. हे भाषण अर्थातच अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक असावे अशी अर्थातच अपेक्षा असते. या दृष्टीने १९७५ मधील ६ जानेवारीचे महनीय प्रवक्ते म्हणून श्री. मुकुंदराव किर्लोस्कर यांची योजना करण्यात आली. त्यांनी निमंत्रण स्वीकारलेही परंतु दुर्दैव असे की पत्रकार दिनाच्या सहा दिवस आधी १ जानेवारी १९७५ रोजी मुकुंदरावांचे वडील शं. वा. किर्लोस्कर यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे मुकुंदराव पत्रकार दिनांचा येऊ शकत नव्हते हे स्पष्ट होते. तसे त्यांनी कळवलेही. आता आयत्या वेळी कोणाला आणायचे हा प्रश्न निर्माण झाला. उरलेल्या तीन-चार दिवसात बाहेर गावच्या वक्त्याची व्यवस्था करणे अशक्य होते. शेवटी मुंबईतीलच एखादा ज्येष्ठ पत्रकार असावा मग तो इतर भाषेतील असला तरी चालेल असे ठरले. इलस्ट्रेटेड वीकलीचे संपादक खुशवंतसिंग यांना बोलावण्याचे ठरले. या कामात महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर यांचे साह्य घेण्यात आले. आणि खुशवंतसिंग ६ जानेवारी १९७५ च्या पत्रकार दिनाचे महनीय प्रवक्ते ठरले. मराठीतर पत्रकाराने पत्रकार दिनाचा महनीय प्रवक्ता होण्याचा मान मिळवला. त्यानंतर अनेक मराठीतर पत्रकारांना हा मान मिळाला. त्यात मेनस्ट्रीमचे संपादक निखिल चक्रवर्ती, मोइउद्दिन हॅरिस, गुजराथी संपादक हरिन्द्र दवे, डेलीचे संपादक जे. डी. सिंग, जनसत्ताचे संपादक प्रभाष जोशी, नवभारत टाइम्सचे संपादक विश्वनाथ सचदेव अशी काही नावे आहेत. मराठी पत्रकार संघाने आता मराठी पत्रकारांची मर्यादा ओलांडली आहे. कोणत्याही भाषेतील पत्रकाराला निमंत्रण देण्यात येते. त्यामुळे इतर भाषेतील वृत्तपत्रसृष्टीत काय चालले आहे तेही कळते.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com