वास्तू शांती व स्नेहमीलन

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दि. १ एप्रिल १९९५ रोजी या प्रकल्पासाठी वाहून घेणारे संघाध्यक्ष वसंत लक्ष्मण शिंदे व त्यांच्या पत्नी सौ. विद्या वसंत शिंदे यांच्या हस्ते वास्तुशांत करण्यात आली. त्यानिमित्ताने पत्रकार संघाचे सदस्य व त्यांच्या कुटुंबियांचे स्नेहभोजन व स्नेहमीलन आयोजित करण्यात आले. राज्यात युतीचे सरकार होते. पत्रकार संघाची जागा हरित पट्ट्याच्या आरक्षणातून वगळताना महापालिकेचे नगरसेवक असलेली व आता राज्यात सत्तेवर आलेली मंडळी सर्वश्री मनोहर जोशी ( मुख्यमंत्री), सुधीर जोशी (महसूलमंत्री), दत्ताजी नलावडे ( अध्यक्ष, महाराष्ट्र विधान सभा), हशू अडवाणी (अर्थमंत्री) यांना वास्तुशांती प्रसंगी सदिच्छा भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा 'वर्षा'वर गुढी उभारल्यानंतरचा हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यांच्या पत्नी सौ. अनघा जोशी तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर, खासदार विद्याधर गोखले व मोहन रावले, भवन निधी समितीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती जयंतराव टिळक, सौ. इंदुताई टिळक प्रभृती मान्यवर यावेळी हजर होते. त्यानंतर पत्रकार भवन प्रकल्प पूर्तीसाठी संघाध्यक्ष वसंत शिंदे यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री निधीतून २५ लाख रुपयांचे भरीव व एकरकमी अर्थसहाय्य दिले. त्यानंतरही मनोहर जोशी यांनी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिलेले आहे. मुंबई महापालिकेने १० लाख रुपये तदर्थ अनुदान मंजूर केले परंतु प्रत्यक्षात पाच लाख रुपये देण्यास पालिकेची अंतिम मंजुरी मिळालेली आहे. उद्योगपती व पत्रकार संघाचे हितचिंतक अण्णासाहेब डहाणूकर यांनी दिलेल्या चार लाखांच्या देणगीतून पत्रकार भवनातील पहिल्या मजल्यावरील सभागृह सुसज्ज करण्यात आले आहे. याशिवाय श्री. सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट, नॅशनल स्कूल ऑफ बॅंकिंगचे संचालक एकनाथ के ठाकूर, मे. मेकर डेव्हलपमेंट सर्व्हिसेस लि. यांच्याकडूनही पत्रकार भवनासाठी प्रत्येकी १ लाख रुपये देणगीदाखल मिळाले आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम आणि पुण्याचेच एक उद्योजक प्रकाश जांभूळकर यांच्याकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांची देणगी मिळाली. भवनातील उद्‍वाहन उभारणीचे काम करणार्‍या मे. ओटिस एलेव्हेटर कंपनीकडून भारतीय विद्यार्थी सेनेच अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी पत्रकार संघाला १ लाख ६५ हजार रुपये इतकी भरीव सवलत मिळवून दिली. या कामी अ‍ॅड. राजन शिरोडकर यांचेही सहकार्य लाभले. पत्रकार संघाच्या सदस्यांनी व कुटुंबियांनी भवन निधीसाठी हातभार लावलेला आहे. अशा प्रकारे एकंदर सुमारे १ कोटी रुपयाचें भवन पूर्ण होऊन मराठी पत्रकारांचे स्वप्न साकार झाले आहे.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com