संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभाग

संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख आला आहेच तेव्हा एक गोष्ट मोठ्या अभिमानाने येथे नमूद केली पाहिजे आणि ती म्हणजे मराठी भाषिकांचा स्वतंत्र प्रांत करावा ही जाहीर मागणी प्रथम मराठी पत्रकारांनी केली. मराठी पत्रकार परिषदेचे तिसरे अधिवेशन केसरीचे संपादक ज.स. करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भरले. या अधिवेशनात व्यावसायिक प्रश्नांबरोबरच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा विचार झाला. या परिषदेत डॉ. ग. य. चिटणीस यांनी याबाबत ठराव मांडला व प्रभाकर पाध्ये यांनी त्याला अनुमोदन दिले. मूळ ठरावात मराठी भाषिकांचे राज्य निर्माण करावे एवढीच मागणी होती. परंतु आप्पा पेंडसे यांनी सदर ठरावाला उपसूचना मांडली की, "मुंबई राजधानी असलेले मराठी भाषिक राज्य निर्माण करावे." या उपसूचनेला मनोहर नाबर यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सौ. प्रमिला ओक यांनी दुसरी उपसूनचा मांडली. ती अशी, "मराठी भाषिक राज्याचे महाराष्ट्र व विदर्भ असे दोन उपप्रांत असावे. व्यंकटेश वकील यांनी या उपसूचनेस पाठिंबा दिला. पंरतु ही उपसूचना फेटाळण्यात आली व आप्पा पेंडसे यांच्या उपसूचनेसह मूळ ठराव मंजूर झाला. तेव्हापासून मराठी पत्रकारांनी महाराष्ट्र निर्मितीसाठी सातत्याने आपल्या लेखण्या झिजविल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काही पत्रकारांनी भागही घेतला. आचार्य अत्रे, आप्पा पेंडसे, दिनू रणदिवे, बाळ देशपांडे, राजा मिराशी, मधु शेट्ये, अशोक पडबिद्री प्रभृतींनी तुरुंगवासही भोगला. आचार्य अत्रे यांचे 'मराठा' दैनिक हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्रच झाले होते. दिनू रणदिवे व अशोक पडबिद्री यांनी 'संयुक्त महाराष्ट्र पत्रिका" नावाचे साप्ताहिकही काही काळ चालविले. महाराष्ट्र निर्मितीमध्ये मराठी पत्रकारांचा फार मोठा वाटा आहे असं म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास लिहिताना मालतीबाई तेंडुलकर, गो. बा. महाशब्दे, मधु शेट्ये, आप्पा पेंडसे, बाळ देशपांडे, पुष्पा त्रिलोकेकर, भाऊसाहेब नेवाळकर, वसंत आ. मोरे, रमाकांत पारकर, दिनू रणदिवे, अशोक पडबिद्री, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, 'प्रभात'कार वा. रा. कोठारी, श्री. शं. नवरे, ग. त्र्यं, माडखोलकर प्रभृती पत्रकारांची नावे प्रामुख्याने लिहावी लागतील.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com