साहित्य व नाट्य क्षेत्रातील योगदान

मुंबईतील मराठी पत्रकारांचा साहित्यक्षेत्रातही फार मोठा गवगवा आहे. बर्‍याच पत्रकारांनी साहित्यात फार मोठी कामगिरी केलेली आहे. कथा, कादंबर्‍या, काव्य या क्षेत्रात बर्‍याच मराठी पत्रकारांची नावे मशहूर आहेत. नाट्य क्षेत्रात तर असंख्य पत्रकारांची नावे आहेत. प्रबोधकार ठाकरे, कृ.प.खाडिलकर व आचार्य प्र. के. अत्रे यांच्या पासून ही यादी सुरू करावी लागेल. काव्य आणि नाट्यलेखन या क्षेत्रात सर्व साहित्यिकात पहिले नाव आचार्य प्र. के. अत्रे हे लिहावे लागेल. याखेरीज पटकथा लिहिण्यातही ते आघाडीवर होते. विद्याधर गोखले हे नाट्यलेखनातील आणखी एक प्रमुख नाव आहे. संगीत रंगभूमीचा पुनर्जन्म त्यांनी घडविला. खेरीज काव्य प्रांतातही त्यांनी चांगले नाव कमावले आहे. ह. रा. महाजनी, मो. ग. रांगणेकर, आत्माराम सावंत यांनीही रंगभूमीची सेवा केली आहे. यशवंत रांजणकर यांचेही नाव रंगभूमीशी जोडलेले आहे. (साहित्य व नाट्यक्षेत्रात ज्यांनी आपले योगदान दिलेले आहे त्याची यादी पुढे दिली आहे.) आप्पा पेंडसे, बाळ सामंत, ज्ञानेश्वर नाडकर्णी, जयवंत दळवी, कमलाकर नाडकर्णी, ग. वा. बेहेरे, वा. य. गाडगीळ, प्रशांत दळवी, माधव मनोहर, राजा कारळे, सुधीर दामले, माधव गडकरी, प्रभाकर नेवगी, जयंत पवार, विजय तेंडुलकर, रमेश मंत्री, राजा राजवाडे, आत्माराम शेट्ये, लता राजे, संजीवनी खेर, यशवंत पाध्ये, पंढरीनाथ सावंत इत्यादी.

नाट्यक्षेत्रातील थोडे जुन्या जमान्यातील गाजलेले नाव म्हणजे कृष्णाजी प्रभाकर तथा काकासाहेब खाडिलकर हे नाव. त्यांची सर्व नाटके रंगभूमीवर गाजली आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेला पुण्याला केसरीत सुरुवात केली आणि नंतर मुंबई येऊन 'नवाकाळ' हे दैनिक सुरू केले. त्यांची जन्मशताब्दी मुंबई मराठी पत्रकार संघाने ५,६ व ७ जानेवारी १९७३ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेऊन साजरी केली. 'नाटककार खाडिलकर', 'पत्रकार खाडिलकर' व 'तत्त्वचिंतक खाडिलकर' असे तीन विषय स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. श्री. श्री. शं. नवरे, प्रा. राम जोशी व श्रीमती लीलावती भागवत यांनी परीक्षक म्हणून काम केले. तीन विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

खाडिलकर शताब्दीनिमित्त पत्रकार व नाटककार यांचा एक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला शंभर-सव्वाशे जण उपस्थित होते. या निमित्ताने एक सुरेख स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. तिला स्मरणिका म्हणण्यापेक्षा स्मृतिग्रंथ म्हणणे अधिक संयुक्तिक होईल. या स्मृतिग्रंथात वसंत शांतारम देसाई, श्री. शं. नवरे, त्र्यं. वि. पर्वते, य. कृ. खाडिलकर आदींचे नाट्याचार्यांवरील लेख तसेच अनेक दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली.

मुंबई मराठी पत्रकार संघाने आपल्या कार्याला केवळ मराठी पत्रकारिता आणि मराठी पत्रकार एवढ्याच सीमा घालून घेतलेल्या नाहीत तर भाषिक पत्रकारितेकडेही लक्ष दिले आहे व त्यांच्याही महत्त्वाच्या टप्प्यांची दखल घेतली आहे. हिन्दी पत्रकारितेला १९७६-७७ मध्ये १५० वर्षे पूर्ण झाली. त्याची नेंद मराठी पत्रकार संघाने घेतली. हिन्दी पत्रकारितेत मराठी भाषिक पत्रकारांचे फार मोठे योगदान आहे. आणि अशा पत्रकारांचा मराठी पत्रकारांना अभिमान आहे. उत्तर प्रदेशातील हिन्दी पत्रकारितेत बाबुराव पराडकर हे अग्रगण्य नाव आहे. कै. बाबुराव पराडकर यांच्या घराण्याने हिन्दी पत्रकारितेची परंपरा चालू ठेवली आहे. म्हणून त्यांच्या पुतण्याला बोलावून हिन्दी पत्रकारितेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. कै. बाबुरावांचे हे पुतणे हिन्दीतील एक ज्येष्ठ पत्रकार असून कवीही आहेत.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com