स्थापनापूर्व संमेलन

मुंबई मराठी पत्रकार संघाची रीतसर स्थापना होण्यापूर्वी एप्रिल १९४१ मध्ये मुंबईतील मराठी पत्रकारांचे एक संमेलन मौज-प्रभात कार्यालयात झाले. यात पत्रकारांचा परस्पर परिचय वाढावा व विचारांची देवाणघेवाण व्हावी असा हेतू होता. यात कोणतीही घटना तयार करून तिला स्थायी स्वरूप आणावे असा हेतू नव्हता. वृत्तपत्रांनी आळीपाळीने अशी संमेलने भरवावीत असे ठरले. ज्या वृत्तपत्राने संमेलन बोलवावयाचे त्याने आपल्या ऐपतीनुसार अल्पोपहाराची व्यवस्था ठेवावी असा अलिखित नियम होता. जमलेले पत्रकार विविध विषयांवर चर्चा करीत. त्यामुळे पत्रकारांचे प्रबोधनही होई. हा कार्यक्रम चार-पाच वर्षे चालला. या कार्यक्रमात भेळेपासून तो पक्वान्नांच्या भोजनांपर्यंत आदरतिथ्ये होत. परंतु पुढे हळूहळू पत्रकारांची संख्या रोडावू लागली. युद्धकाळात शिधावाटप पद्धतीमुळे जेवणावळींवर बंधने आली. त्यामुळे या कार्यक्रमात अनियमितपणाही आला व हळूहळू ही संमेलने बंद पडली. परंतु अशा एका संमेलनाची नोंद श्री.शं.नवरे यांच्या लेखात आढळून येते. त्यावेळी श्री. शं. नवरे व 'मौज'चे संपादक द.पु.भागवत यांच्या सहीने मुंबईतील पत्रकारांना या नवीन उपक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणाला मान देऊन पुढील पत्रकार संमेलनाला उपस्थित असल्याची नोंद आहे : मामा वरेरकर, अनंद हरी गद्रे, य. कृ. खाडिलकर, का.म.ताम्हनकर, र.धों. कर्वे, अनंत काणेकर, त्र्यं.वि.पर्वते, श्री.रा.टिकेकर, खं. सा. दौडकर, भा.र.कद्रेकर, सौ. मालतीबाई तेंडुलकर, माई वरेरकर, सौ. अंबिका बेहेरे, कॉ. के. नी. जोगळेकर, अनंत अंतरकर, रा. ल. गोगटे , ना.म.घाटे, श्री. म. सहस्त्रबुद्धे, अ.ना.परांजपे, तु.कृ. सरमळकर, दा. मो. नामजोशी, रमाकांत वेल्दे, सुंदरराव मानकर, रघुवीर रेळे, आप्पा पेंडसे, द. गो. देशिंगकर, पु. बा. लिमये, रॉय किणीकर, प्रभाकर गणेश गुप्ते, माधवराव तेंडुलकर, शं.वि. सालये, पु.बा.कुलकर्णी, शिवराम श्री. वाशीकर, ज.म.घाटे, गो. बा. महाशब्दे, भ.द.टेंबे, द.शं.कुलकर्णी, प्र.के.गुप्ते, र.ना.लाटे, वालावलकर, गो.शं.पतके, अ.सी. केळुसकर, दि. वि. तथा तात्या आमोणकर, द. वा. केळकर, माधव मनोहर, कृ. वि. सोमण, मराठे, द. पु. भागवत, श्री. शं. नवरे. ( 'नवयुग'कार आचार्य अत्रे, 'संजीवनी'कार प्र.श्री.कोल्हटकर हे आयत्या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत.) श्री. शं.नवरे म्हणतात, वरील यादीवरून संमेलनाचे 'वजन' लक्षात येईल. मुंबईतील ज्या ज्या पत्रांनी अशी स्नेह संमेलने भरवून एकमेकांचे संबंध दृढ केले त्यामुळे पत्रकार संघाची स्थापना करणे सुलभ झाले. मे १९४१ मधील पुण्याचे दुसरे पत्रकार अधिवेशन झाल्यावर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष प्रा. न.र. फाटक यांचा सत्कार करण्यासाठी फोर्टमधील तांबे यांच्या उपाहारगृहात सर्व पत्रकार एकत्र जमले होते. तेथे संघ स्थापन करण्याचा विचार चालू असता शेजारच्या 'लोकमान्य' कचेरीतून एक पत्रकार धापा टाकीत पळत आला. त्याने टेलीप्रिंटरवर आलेली वार्ता सांगितली की, हिटलरने रशियावर स्वारी केली ! या सनसनाटी बातमीच्या संभाव्य परिणामांविषयी एकीकडे पत्रकार आपसात चर्चा करीत असताच दुसरीकडे मुंबई मराठी पत्रकार संघ स्थापन होत होता. तो दिवस २१ जून १९४१ हा होता.

दरम्यान, पत्रकार संघाला स्थायी स्वरूप प्राप्त झाले होते. संघाची वार्षिक सभा संमेलनाच्या स्वरूपातच होऊ लागली. शिवाय काही नैमित्तिक सभा समारंभ होत त्यात थोडा अल्पोपहार व चहापान होई. याचा अर्थ संघाची सांपत्तिक स्थिती चांगली होती असा मुळीच नाही. कारण संघाची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून निधी उभारण्याचा पद्धतशीर प्रयत्न झालाच नाही. येणारी वर्गणी इतक्या कार्यक्रमांना पुरी पडत नसे. हे सर्व कार्यक्रम बहुधा फोर्टमधील बी. तांबे लिमिटेडच्या विश्रांतीगृहात होत. वार्षिक सभाही तिथेच होई. बी. तांबे लि. हे काकासाहेब तांबे यांचे विश्रांतीगृह. ते संघाचे सदस्य होते. जेवढे पैसे संघाकडे असतील तेवढे पैसे संघ देई, उरलेली रक्कम काकासाहेब तांबे देत. त्यामुळे हे कार्यक्रम करणे जमत असे.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com