स्थावर मालमत्ता

व्यक्ती असो वा संस्था, एक गोष्ट त्या सर्वांनाच समाधान देते आणि ती म्हणजे स्वत:च्या मालकीचे घर असणे, वास्तू असणे. आता तर स्थिती अशी आली आहे की प्रत्येकाला एखाद्या सहकारी गृहनिर्माण संस्थेत स्वत:च्या नावावर सदनिका असणे ही बाब मोठी अत्यावश्यक व अभिमानाची मानली जाते. मुंबई मराठी पत्रकार संघाची स्वत: वास्तू नव्हती. विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर तशी पत्रकार संघाची स्थिती होती. पत्रकार संघाचा अध्यक्ष वा चिटणीस यांचे निवासस्थान म्हणजेच पत्रकार संघाची कचेरी. कार्यकारिणीच्या सभा नवाकाळ कचेरी, साहित्य संघ अशा विविध ठिकाणी भरत. वार्षिक सर्वसाधारण सभा मात्र फोर्टमधील बी. तांबे लि. च्या विश्रांतिगृहात भरत. संघ कचेरीसाठी काही काळ साहित्य संघाने जागा दिली, काही काळ ग.का. रायकर यांचं पुस्तकाचं दुकान ही पण संघाची कचेरी झाली तरी एकूण त्रिस्थळी यात्राच होती.

संघाच्या या त्रिस्थळी यात्रेतच संघाचे काम १९५५ ते ६१ असे सहा वर्षे बंद पडले. त्या काळात संघाचे अध्यक्षपद लोकमान्याचे वि.स.बापट व चिटणीसपद राजा केळकर यांच्याकडे होते. या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला होता. संघाच्या कार्यात घालणारी काही मंडळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गुंतली होती. त्यामुळे संघाच्या पुनरुज्जीवनाकडे कोणाचे लक्षच गेले नाही. अखेर 'वसंत' मासिकाचे संपादक दत्तप्रसन्न काटदरे आणि तरुण भारत, बेळगावचे ग.वा.देशपांडे वगैरे पत्रकारांनी संघाचे काम पुन्हा सुरू केले.

संघाची ही भ्रमंती संपवावी या हेतूने १९६४ साली संघाचा कार्यकारिणीत पत्रकार भवन बांधण्याची कल्पना प्रथम चर्चिली गेली. त्यानंतर संघाचे अध्यक्ष गो. मं. लाड यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेऊन पत्रकार भवनासाठी एक भूखंड द्यावा अशी विनंती करणारे पत्र दिले. मुख्यमंत्र्यांनी निश्चित असे कोणतेच आश्वासन दिले नाही तरी ते या कल्पनेला अनुकूल होते असा सर्व पत्रकारांचा समज झाला. मधे काही महिने गेले आणि शासनातर्फे पत्रकार संघाला नकाराचे उत्तर आले. या पत्राने लाड हे नाराज झाले व एखादी सदनिका विकत घ्यावी असा विचार सुरू झाला. त्यावेळी विविध पत्रांचे मंत्रालयात असलेले वार्ताहर यांनी लाड यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी असा आग्रह धरला. लाड नाखुशीनेच मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "तुम्हाला शासनाचे उत्तर आले आहे ते औपचारिक आहे. असे उत्तर सर्वच संस्थांना पाठविण्यात येते. पण पत्रकारांची सोय केली पाहिजे. काहीतरी मार्ग काढू." लाड यांचे या उत्तराने फारसे समाधान झाले नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी काहीतरी करण्याचे आश्वासन दिले यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. मंत्रालयात प्रतिनिधित्व करणारे विविध वृत्तपत्रांचे जे वार्ताहर होते त्यांनी हा प्रश्न हाती घेतला आणि ते मुख्यमंत्र्यांच्या मागेच लागले. मुख्यमंत्र्यांची भेट झाली की वार्ताहर त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देत. मुख्यमंत्रीही हसत हसत पाईप तोंडात ठेवून मान हलवित आणि आपणाला या गोष्टीची आठवण आहे याची खात्री देत. त्यावेळी लोकसत्तेचे कृ.पां.सामक, भालचंद्र मराठे, विनायक तिवारी यांच्यासारखे ज्येष्ठ व मुरलेले पत्रकार मंत्रालयात होते. त्यांना टाळणे मुख्यमंत्री नाईक यांना अशक्यच होते. या वार्ताहरांची कटकट मिटविण्याच्या दृष्टीने का होईना पण मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा गंभीर प्रयत्‍न केला असेच म्हणावे लागेल.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com