स्पर्धा व पारितोषिके

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आज अनेक स्पर्धा होतात. पारितोषिके आणि पुरस्कार दिले जातात. १९७५-७६ मध्ये या स्पर्धांना सुरुवात झाली व नंतर अनेक पुरस्कारही दिले जाऊ लागले. परंतु पत्रकार संघाने पहिली स्पर्धा घेतली व पारितोषिके दिली ती १९४९ साली. संघाचे त्यावेळचे अध्यक्ष श्री. आप्पा पेंडसे यांनी त्यावेळी संघाला १०० रु. देणगी देऊन एक निबंध स्पर्धा घेतली. या निबंध स्पर्धेसाठी विषय होता, "मराठी दैनिके कशी आहेत व कशी असावीत?" उत्कृष्ट तीन निबंधांना रु. ५०, रु. ३० व रु. २०  अशी पारितोषिके देण्यात आली. या निबंधस्पर्धेसाठी प्रा. कृ. पां. कुळकर्णी, अ‍ॅड. सुशील कवळेकर, डॉ. वसंत दीनानाथ राव यांनी परीक्षक म्हणून काम केले. तिघे पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे होते. - १) कृ.के.रहाळकर, अलिबाग २) सु. वि. ओक, मुंबई ३) प्र. गो. नूलकर, सोलापूर. यानंतर अशी स्पर्धा घेण्यास कोणी पुढे आले नाही.

१९७५-७६ साली पत्रकार संघाने दोन स्पर्धा सुरू केल्या. एक संपादकीय लिखाणासाठी व दुसरी दिवाळी अंकांसाठी. प्रसिद्ध उद्योगपती अण्णासाहेब डहाणूकर यांनी एक विश्वस्त निधी स्थापन करून त्यातून येणार्‍या उत्पन्नातून स्वतंत्र वृत्तीचे लिखाण केलेल्या संपादकीय लिखाणांचा गौरव या स्पर्धेत करण्यात येई. 'डहाणूकर पत्रकारिता स्पर्धा' या नावे ही स्पर्धा ओळखण्यात येते. या स्पर्धेसाठी श्री. अण्णासाहेब डहाणूकर यांनी एक स्वतंत्र विश्वस्तनिधी स्थापन करून त्याच्या उत्पन्नातून पारितोषिके दिली जातात. या स्पर्धांची सर्व जबाबदारी त्यांनी पत्रकार संघावर टाकली आहे. पत्रकार संघाने ती जबाबदारी स्वीकारून आतापर्यंत दर वर्षी यशस्वीपणे पार पाडली आहे. प्रवेशिका मागविणे, परीक्षक नेमून त्यांच्याकडून पारितोषिक विजेते निवडणे व प्रत्यक्ष पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करणे, त्यासाठी मान्यवर पाहुणा बोलाविणे वगैरे कामे पत्रकार संघ दरसाल पार पाडीत आहे.

अण्णासाहेब डहाणूकर यांनी १९७३-७४ मध्ये विश्वस्तनिधी स्थापन केला. पण पहिली स्पर्धा १९७४-७५ मध्ये झाली. त्यासाठी १९७३-७४ चे लिखाण विचारात घेण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. वा.ल.कुळकर्णी, श्री. ल.ना. गोखले व श्री. शां. शं. रेगे व श्री. रमेश संझगिरी यांनी काम केले. तेव्हापासून दरवर्षी अव्याहतपणे ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भाग घेणे हाच आपला गौरव आहे असे पत्रकार मानतात त्यामुळे भाग घेणार्‍यांची संख्या वाढत्या प्रमाणावर आहे. ही स्पर्धा आयोजित करण्याची सर्व कामगिरी जरी मुंबई मराठी पत्रकार संघावर असली तरी ती सर्व महाराष्ट्रासाठी खुली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोनाकोपर्‍यातून स्पर्धेसाठी लिखाण येते.
ही स्पर्धा चार विभागात विभागण्यात आली. अग्रलेख, खास लेख, ग्रामीण वार्तापत्र व उत्कृष्ट छायाचित्र अशी बक्षिसे देण्याचे ठरले. पहिली दोन बक्षिसे प्रत्येकी ५०० रुपयांची आणि दुसरी दोन प्रत्येकी २५० रुपयांची होती. या बक्षिसांना त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांची नावेही देण्यात आली. उत्कृष्ट अग्रलेखाला कै. काकासाहेब खाडिलकर यांचे नाव देण्यात आले. पुढे उत्कृष्ट छायाचित्रासाठी जयंत काकडे यांचे नाव देण्यात आले. जयंत काकडे हे मराठी वृत्तपत्रसृष्टीतील एक नाव कमावलेले छायाचित्रकार होते.

स्पर्धेची लोकप्रियता वाढली तेव्हा अण्णासाहेब डहाणूकरांनी बक्षिसांच्या रकमातही वाढ केली. सर्वोत्तम अग्रलेखासाठी असलेल्या कै. काकासाहेब खाडिलकर पारितोषिकाची रक्कम रु. ४००० करण्यात आली. लोकहितवादी यांच्या नावे पारितोषिक रु. २००० चे करण्यात आले. ग्रामीण वार्तापत्रासाठी असलेले कै. ना. भि. परुळेकर पारितोषिकाची रक्कम रु. १००० करण्यात आली. आणि उत्तम छायाचित्रासाठीही १००० रु. पारितोषिक देण्याचे ठरले. अण्णासाहेब डहाणूकरांनी एक उत्तम स्पर्धा आयोजित करण्याची संधी पत्रकार संघाला दिली.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com