स्मृतिमंदिराचे उद्घाटन

वार्षिक निवडणुका झाल्यावर १९७४-७५च्या कार्यकारिणीने १९७५-७६च्या कार्यकारिणीकडे कार्यभार सोपविला. त्यावेळी लोणावळ्याच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे काम झाले होते. नव्या कार्यकारिणीने आदल्या वर्षीप्रमाणेच दोन स्मरणिका प्रसिद्ध करून निधी जमविला. याखेरीज काही वैयक्तिक देणग्या जमविण्याचे काम आधीच्या वर्षाप्रमाणेच केले. दोन वर्षात आवश्यक तितका निधी जमला इमारत पुरी झाली. इमारतीच्या तळ मजल्यावर एक छोटे सभागृह करण्यात आले. कै. तेंडुलकर यांच्या दैनंदिन वापरातील वस्तू व त्यांनी जमविलेल्या दुर्मिळ वस्तू एका खोलीत ठेवून एक छोटेसे वस्तुसंग्रहालय तयार करण्यात आले. त्याला लागून एक राहण्याची खोली तयार करण्यात आली. पहिल्या मजल्यावर चार कुटुंबे राहू शकतील अशा चार खोल्या बांधण्यात आल्या. शिवाय स्वयंपाकघर. या सर्व खोल्यांतून खाटा, गाद्या, पलंगपोस, उशा, टेबल, खुर्च्या आदींनी सुसज्ज करण्यात आले. कै. तेंडुलकर स्मृतिमंदिर उद्‍घाटनास तयार झाले. ११ एप्रिल १९७६ रोजी तेंडुलकर स्मृतिमंदिर, पत्रकारांचे विश्रामधाम याचे केंद्रीय संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले आणि समारंभाचे मुख्य पाहुणे होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण.

उद्‍घाटनाचा हा समारंभ मुंबईच्या मराठी पत्रकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता कारण पत्रकार संघाच्या पहिल्या वास्तूचे ते उद्‍घाटन होते. परंतु त्यापेक्षाही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने हा समारंभही महत्त्वाचा ठरला कारण महाराष्ट्रातील दोन राजकीय प्रतिस्पर्धी या समारंभात एकाच व्यासपीठावर एकत्र आले. यशवंतराव चव्हाण व शंकरराव चव्हाण यांचे संबंध पार बिघडले होते. दोघांचे बोलणे चालणे नव्हते. दोघांमधून विस्तव जात नव्हता. ते दोघे पत्रकार संघाचे निमंत्रण गेल्यावर ताबडतोब येण्यास तयार झाले आणि आलेही. प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांची भेट पत्रकार संघाच्या व्यासपीठावर झाली आणि दोघे एकमेकांशी बोललेही. पत्रकार राजकीय नेत्यांत भांडणे लावतात अशी तक्रार राजकारणी करतात परंतु पत्रकार राजकीय नेत्यांमधली भांडणे मिटविण्यासही मदत करतात हे या समारंभाने दाखवून दिले. त्यावेळचे पत्रकार संघाचे अध्यक्ष राधाकृष्ण नार्वेकर हे आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की, दोन चव्हाणांना एकत्र आणण्याची ऐतिहासिक कामगिरी पत्रकार संघाने आज पार पाडली आहे. सर्व उपस्थितांनी या विधानाला दाद दिली. उभय चव्हाणांनी स्मित हास्याने या विधानाचे स्वागत केले व आपल्या भाषणातही त्याचा उल्लेख केला. पत्रकारांच्या व राजकारण्यांच्या अशाप्रकारे दोघांच्याही स्मरणात राहील असा हा कार्यक्रम झाला.

लोणावळे येथे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मालकीची सुंदर वास्तू उभी राहिली परंतु मुंबईत मात्र संघाच्या मालकीची जागा नव्हती. जी जागा होती ती भाड्याची व जुनी होती. मोडकळीसही आली होती. आझाद मैदानातील या जुन्या वास्तूचे नूतनीकरण करण्यासाठी ती पाडून सार्वजनिक बांधकाम खात्याने नव्या वास्तूचे आराखडेही तयार केले. योगायोग असा की, वसंत शिंदे यांनी संयुक्त कार्यवाह म्हणून ४ डिसेंबर १९७० रोजी ताब्यात घेतलेली वास्तू, शिंदे यांच्याच अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत नूतनीकरणासाठी जमीनदोस्त करण्यात आली. त्या जागेत पत्रकार संघाने एक दशक साजरे केले होते (१९७० ते १९८०). त्यावेळी पत्रकार संघाचे दप्तर तात्पुरते शेजारच्या अ.भा.मराठी पत्रकार परिषद कार्यालयात हलविण्यात आले. तेथेच संघासाठी कायमस्वरूपी जागा मिळवून तिथे स्वत:ची टुमदार वास्तू (भवन) उभारण्याचे स्वप्न त्यावेळचे अध्यक्ष वसंत शिंदे व कार्यवाह कुमार कदम यांना पडले. तेथेच कुमार कदम यांनी एका कागदावर आझाद मैदानातील वडाच्या झाडांपासूनचा आयाताकृती भूखंड पत्रकार भवनासाठी मिळावा म्हणून नकाशा तयार केला. भाडेपट्ट्याने मिळालेल्या घराचे नूतनीकरण करण्याची योजना मागे पडू लागली व आझाद मैदानातच पत्रकारांच्या संघटनांचा 'प्रेस कॉम्प्लेक्स' उभारण्याची संकल्पना पुढे आली. आझाद मैदानाचा काही भूभाग मैदानाच्या म्हणजेच हरित पट्ट्याच्या आरक्षणातून वगळण्याविषयीचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने सर्वानुमते मंजूर केला. या घटनेला संघाध्यक्ष वसंत शिंदे, माजी अध्यक्ष राधाकृष्ण नार्वेकर, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत देसाई, ना.ग. मुसळे प्रभृती साक्षी होते. त्यावेळी महापालिका सदस्य असलेले विविध पक्षांचे सर्वश्री बाबूराव शेटे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, शरद आचार्य, हशू अडवाणी, डॉ. प्रभाकर पै. दत्ताजी नलावडे, बाबूराव शेलार यांचा या कामी सक्रिय पाठिंबा मिळाला.

सदर जागेचा ताबा मुंबई मराठी पत्रकार संघाकडे देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी दि. ४ जुलै १९८१ रोजी 'वर्षा' बंगल्यावर झालेल्या समक्ष भेटीत मान्य केले. या भेटीच्या वेळी संघाध्यक्ष वसंत शिंदे, कार्यवाह कुमार कदम, कार्यकारिणी सदस्य दिनकर रायकर व भारतकुमार राऊत हे उपस्थित होते. 'प्रेस क्लब'तर्फे दिगंबर खाडे व मृणाल घोष हजर होते. या भेटीच्या अनुरोधाने पत्रकार संघाच्या कार्यकारिणीने एक ठराव मंजूर केला व त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रही सादर केले. बांधकामाचे आराखडे तयार करण्यास सुरुवात झाली. पत्रकार भवन उभारणीचा पाठपुरावा करण्यासाठी कार्यकारिणीने वसंत शिंदे, कुमार कदम व ग.का.रायकर यांच्या समितीची नियुक्ती केली.

 

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com