'ज्ञानप्रकाश'ची शताब्दी

मुंबई मराठी पत्रकार संघाने आपल्या कार्यक्रमात इतकी विविधता आणली आहे की ती पाहून आश्चर्यच वाटते. पत्रकार, वृत्तपत्रे याबाबत तर प्रत्येक घटनेची नोंद पत्रकार संघ घेतो. पुण्याच्या 'ज्ञानप्रकाश' दैनिकाला १९५९ साली शंभर वर्षे पूर्ण झाली. 'ज्ञानप्रकाश'ची शताब्दी ज्ञानप्रकाशने साजरी केली हे स्वाभाविकच आहे. परंतु पुण्याहून प्रसिद्ध होणार्‍या या दैनिकाची शताब्दी मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबईत साजरी करावी हे वैशिष्ट्यपूर्ण नाही काय? या मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या शताब्दी समारंभाला मुंबईचे त्यावेळचे महापौर स.का.पाटील व त्यावेळचे केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ उपस्थित राहिले आणि त्यांनी ज्ञानप्रकाशचे शताब्दीबद्दल अभिनंदन केले तर हा समारंभ मुंबईत साजरा केल्याबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचे कौतुक केले.

भारत स्वतंत्र झाला. नवी घटना अमलात येऊन विचारस्वातंत्र्याचा अधिकार सर्व नागरिकांना मिळाला. याचा अर्थ वृत्तपत्रे स्वतंत्रपणे आपले विचार मांडू शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु वास्तवात वृत्तपत्रांवर काही बंधने राहिलीच. अनेक वृत्तपत्रांना अब्रुनुकसानीच्या खटल्यांना तोंड द्यावे लागले. सरकार, विशेषत: मंत्री त्यांच्यावर होणार्‍या टीकेबाबत फारच हळुवार मनाचे झाले असे दिसू लागले. औरंगाबादहून प्रकाशित होणार्‍या 'मराठवाडा' (आता दैनिक) साप्ताहिकाने त्यावेळचे पुरवठामंत्री होमी तल्यारखान यांच्यावर कठोर टीका केली. त्यावेळच्या राज्य शासनाने हे प्रकरण न्यायालयात नेले. वास्तविक होमी जे.एच. तल्यारखान हे मंत्री होण्यापूर्वी पत्रकार होते. तेव्हा ते या गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार नाहीत आणि न्यायालयात जाणार नाहीत असे वाटत होते. परंतु त्यांनी इतर राजकीय नेत्यांप्रमाणेच वागणूक केली आणि मराठवाडाचे संपादक अनंतराव भालेराव यांना न्यायालयापुढे उभे करण्यास शासनास भाग पाडले. न्यायालयाने अनंतराव भालेराव यांना कारावास व दंडाची शिक्षा सुनावली तेव्हा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री श्री. वंसतराव नाईक यांची भेट घेऊन असे विनविले की, "शासनाचा नैतिक विजय झाला आहे त्यावर समाधान मानून भालेराव यांना शिक्षेत सूट द्यावी." मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या मध्यस्थीस यश मिळेल व भालेराव शिक्षामुक्त होतील असे वाटत होते परंतु दुर्दैवाने पत्रकार संघाला यश आले नाही. हा खटला कोर्टात उभा राहिला तेव्हा तो चालविण्यासाठी पत्रकार संघाने निधी गोळा करून भालेराव यांना आर्थिक सहाय्यही केले होते.

   

पत्रकार संघ इतिहास  

   

   
© Copyright © 2012. patrakarsangh.com